नवी दिल्ली, 9 मार्च : स्पोर्ट्स बाईक (Sports Bike) आणि बॅटमॅनचे (Batman) फॅन असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॅटमॅनची बाईक जगभरातल्या अनेक देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे, पण भारतात अद्याप ही बाईक मिळत नाही. पण आनंदाची बाब म्हणजे भारतातही हुबेहूब बॅटमॅनच्या बाईकसारखी दिसणारी बाईक आढळली आहे. भारतात ही बाईक सापडली असून त्याची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यावर तुम्हालाही ती खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. बाईक कोणी तयार केली? बॅटमॅनची ही खास बाईक होंडाने (Honda) तयार केली आहे. होंडा ही भारतातील दुसरी सर्वात मोठी बाईक उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी आहे. याच कंपनीच्या इंटरनॅशनल युनिट होंडा इंटरनॅशनलने कॉमिक सुपरहिरो बॅटमॅनच्या बाईकसारखी (Batman Comics) दिसणारी बाईक बनवली आहे. त्याचं नाव Honda NM4 Vultus आहे. भारतात सध्या मुंबईत ही एकमेव बाइक उपलब्ध आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. बाईकचे फीचर्स - या बाईकमध्येही कारसारखे अनेक फीचर्स आहेत. ही बाईक ड्युअल क्लच ट्रान्समिशनसह येते. यात हँडब्रेकदेखील आहे. यामध्ये दोन प्रकारचे ड्रायव्हिंग मोड (Driving Mode) उपलब्ध आहेत. त्याचवेळी, यामध्ये गिअर शिफ्टिंग कारच्या ऑटोमॅटिक गिअरप्रमाणे आहे. मारुती अल्टोपेक्षा जास्त पॉवर असलेली बाईक - बॅटमॅनच्या बाईकसारखी दिसणारी Honda NM4 Vultus ही 745cc इंजिनद्वारे चालवली जाते. हे लिक्विड कूल्ड 8v पॅरलल ट्विन इंजिन आहे जे 54 bhp ची पॉवर जनरेट करते. या बाईकचा पीक टॉर्क 68Nm आहे. तुम्हाला याची पॉवर समजावून सांगण्यासाठी उदाहरण द्यायचं झाल्यास, या बाईकमध्ये मारुती अल्टोहून जास्त पॉवर आहे. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की ही बाईक किती पॉवरफूल असेल.
बाईकला आहेत चार डिक्की - बऱ्याच बाईकला डिक्की नसते, त्यामुळे कधी काही सामान घेतलं असेल तर ते ठेवण्यात अडचणी येतात. परंतु बॅटमॅनच्या बाईकसारख्या दिसणाऱ्या या बाईकमध्ये याची काळजी घेण्यात आली आहे. या बाईकमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल चार डिक्की देण्यात आल्या आहेत. या बाईकच्या पुढील बाजूस हँडलजवळ दोन लहान डिक्की ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही प्रत्येकी 1 लिटरच्या आहेत. त्याचवेळी, मागील बाजूसही दोन डिक्की असून त्या 3 लिटरच्या आहेत.
दरम्यान, बॅटमॅनच्या बाईकसारख्या दिसणाऱ्या या बाईकचा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. या बाईकचा व्हिडीओ BikeWithGirl नावाच्या चॅनलने शेअर केला आहे. ही बाईक अद्याप भारतात लाँच झालेली नाही. पण मुंबईत असलेली ही एकमेव बाईक मागवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या बाईकची किंमत 8.6 लाख रुपये आहे.