Kisan Andolan : केंद्र सरकारने वादग्रस्त तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर आता आंदोलक शेतकरी नेत्यांनी सरकारशी चर्चा केल्यानंतर आता आंदोलन संपवण्यात आलं आहे. शेतकरी आता टिकरी, सिंघु आणि यूपी-गाजीपुर बॉर्डरवरून घरी जात असतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. पाहा PHOTOS
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ट्रॅक्टरच्या मोठ्या ताफ्यासह दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेले शेतकरी आंदोलनकर्ते आज सकाळपासून आपापल्या गावी परतायला लागले आहेत.
शेतकऱ्यांनी तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करणे आणि पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वर कायदेशीर हमी देण्यासाठी समिती स्थापन करणे यासह त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील महामार्गावर आंदोलन सुरू केलं होतं. परंतु आता केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन संपवण्यात आलेलं आहे.
आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर आता पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमधील शेतकरी त्यांच्या घरी रवाना झाले आहेत. रंगीबेरंगी लाईट्सने सजलेले ट्रॅक्टर विजयाची गाणी गात ते आंदोलन स्थळांपासून बाहेर पडत आहे.
पंजाबमधील मोगा येथील शेतकरी कुलजीत सिंग ओलाख म्हणाले, 'गेल्या एक वर्षापासून सिंगू बॉर्डर आमचे घर बनले होते. या चळवळीने शेतकऱ्यांना एकत्र केले. आम्ही जात, पात, धर्माची पर्वा न करता काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात एकत्र लढलो. हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे.
गाझीपूर सीमेवरील शेतकरी जितेंद्र चौधरी हे पश्चिम उत्तर प्रदेशातील आपल्या घरी परतण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली तयार करण्यात व्यस्त होते. शेकडो चांगल्या आठवणी आणि 'काळ्या' कृषी कायद्यांविरुद्ध विजय मिळवून मी घरी जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
आंदोलन स्थगित करण्याच्या घोषणेनंतर आंदोलक शेतकरी गाझीपूर, टिकरी आणि सिंघू सीमेवरून आपले तंबू हटवत आहेत.
कृषी कायदे रद्द करण्यासाठी 29 नोव्हेंबर रोजी संसदेत विधेयक मंजूर करण्यात आले. तरिदेखील शेतकर्यांनी त्यांचं आंदोलन संपवण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर सरकारनं त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन संपवण्यात आलं आहे.
सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या की नाही याची पडताळणी करण्यासाठी 15 जानेवारीला पुन्हा चर्चा करू असंही शेतकरी नेत्यांनी सांगितलं.
उद्या सकाळी 8 वाजता शेतकऱ्यांचा मोठा गट गाझीपूर सीमा मोकळी करणार असल्याचं वक्तव्य भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केलं आहे. सीमा रिकामी करण्यास 4-5 दिवस लागतील. त्याचबरोबर मी 15 डिसेंबरला या ठिकाणाहुन निघणार असल्याचंही टिकैत यांनी सांगितलं.