मुंबई, 20 नोव्हेंबर : परग्रहावरचे सजीव अर्थात एलियन्स (Aliens) हा कायमच कुतुहलाचा विषय आहे. म्हणूनच अनेक कथा-कादंबऱ्या-सिनेमे यांमध्ये एलियन्स हा विषय हमखास घेतलेला पाहायला मिळतो. काही जण म्हणतात, की एलियन्स वगैरे काही नसतं; पण तसं म्हणावं तर एलियन्स पाहिल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींबद्दलच्या बातम्या अधूनमधून येत असतात. अलीकडेच एका महिलेने सोशल मीडियावर (Aliens on Social Media) एलियन्सच्या संदर्भात असा दावा केला आहे, की त्यावरून खळबळ उडाली आहे. त्या महिलेचा असा दावा आहे, की एलियन्स तिला भेटायला आले होते आणि त्यांनी तिच्या शरीरातून बिजांडं (Eggs) चोरून नेली. शीरा लुमिरा रीजॉइस (Sheera Lumira Rejoice) असं त्या महिलेचं नाव आहे. एलियन्सना आपल्यात खूप रस आहे, असा दावा तिने केला असून, एलियन्स अनेक वेळा आपल्याला भेटायला आल्याचं ती म्हणते. त्याप्रमाणेच या वेळी एलियन्स भेटायला आले होते; मात्र या वेळी त्यांनी आपल्या शरीरातून बिजांडं काढून पळवून नेली, असा दावा तिने केला आहे. आता एलियन्स त्या बीजांडांशी आपला संयोग घडवून आणून हायब्रिड मुलांना (Hybrid Children) जन्म देण्याचं नियोजन करत आहेत, असं त्या महिलेचं म्हणणं आहे. महिलेने हा सगळा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. तिने सांगितलं, की 2018 साली तिला भेटायला एलियन्स पहिल्यांदा आले होते. त्यानंतर सातत्याने ते तिच्या संपर्कात आहेत. त्यांनी आपल्या शरीरातून बिजांडं चोरली असून, त्यातून हायब्रिड मुलांना जन्म देण्याचा त्यांचा विचार असल्याचं त्या महिलेने सांगितलं. जेव्हा एलियन्स शरीरातून बिजांडं काढत होते, तेव्हा शरीराला लकवा मारल्यासारखं झालं आणि बेशुद्ध झाल्यासारखी स्थिती झाली, असंही त्या महिलेने त्या व्हिडिओत सांगितलं आहे. त्या महिलेने केलेल्या या दाव्यानंतर ऑनलाइन विश्वात (Online World) खळबळ उडाली आहे. अनेकांनी असं म्हटलं आहे, की हे जर खरंच घडलं असेल, तर चिंतेची बाब आहे. कारण यातून जन्माला आलेल्या मुलांमध्ये पृथ्वीवरचा माणूस आणि परग्रहावरचे एलियन्स अशा दोघांचेही गुणधर्म असतील.
अनेक व्यक्तींनी मात्र ही बाब खरी नसल्याचं सांगून, त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. त्यांचं म्हणणं असं आहे, की ही महिला केवळ प्रसिद्धीसाठी असे सनसनाटी दावे करत आहे. प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही, घडण्याची शक्यता नाही. ती महिला केवळ कहाण्या रचत असल्याचं म्हणणं अनेकांनी मांडलं आहे. यातलं खरं-खोटं ती महिला आणि त्या एलियन्सनाच (असले तर) ठाऊक; पण तो व्हिडिओ व्हायरल झालाय, एवढं मात्र नक्की खरं.