नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग (Johannesburg) येथील बँक ऑफ लिस्बन (Bank Of Lisbon)ची इमारत रविवारी पाडण्यात आली. बँकेच्या या इमारतीला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आग लागली होती. या आगीत अग्निशमन दलाच्या तिघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर ही इमारत धोकादायक असल्याने ती पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अशा प्रकारे एखादी इमारत पाडण्याची घटना नवी नाही. पण बँक ऑफ लिस्बनची इमारत पाडण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बँक ऑफ लिस्बनची 22 मजली इमारत फक्त 30 सेंकदात पाडण्यात आली. शहरातील हजारो नागरिकांनी ही इमारत कोसळताना पाहिली. ही इमारत पाडण्यासाठी 894 किलो स्फोटक वापरण्यात आली होती. यूरो न्यूजने दिलेल्या बातमीनुसार अशा प्रकारे पाडण्यात आलेली ही दुसरी मोठी इमारत आहे. बँक ऑफ लिस्बनची इमारत 108 मीटरची होती. याआधी 114 मीटर उंचीची इमारत अशीच पाडण्यात आली होती. पण ही इमारत पाडण्यासाठी अनेक अडचणी होत्या. तरी ते यशस्वीपणे पार पाडण्यात आले.
ही इमारत पाडण्याआधी परिसरातील 2 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. बँक ऑफ लिस्बनच्या इमारतीच्या जागेवर आता नवी इमारत उभी केली जाणार आहे. यात सरकारी कार्यालयांचा देखील समावेश असणार आहे.