इस्लामाबाद, 23 मार्च : कोरोना व्हायरसचा जगभरात धुमाकूळ सुरू आहे. जगात 15 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतापाठोपाठ पाकिस्तान सरकारनंही काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पाकिस्ताननं लॉकडाऊन केलं आहे. या लॉकडाऊनदरम्यान काही तरुण सरकारच्या नियमांचं उल्लंघन करताना पाहायला मिळाले. सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या या तरुणावर पाकिस्तानच्या पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. त्याचा व्हिडीओ ट्विटरवर तुफान व्हायरल होत आहे. नियम मोडणाऱ्या 11 तरुणांना पोलिसांनी भररस्त्यात मुर्गा बनून राहण्याची शिक्षा दिली होती. हे सर्व 11 जण एकमेकांच्या जवळ उभे राहून मुर्गा झाले होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आजूबाजूला फिरत होते.
पाकिस्तानच नाही तर भारतातही काही ठिकाणी अशी शिक्षा देण्यात आल्याचा दावा एका युझरने केला आहे. या मुर्गाचा व्हिडीओ व्हायरसल झाल्यानंतर युझर्सनी अनेक ठिकाणी अशा प्रकारची शिक्षा दिलेल्याचे फोटो शेअर केले आहेत.
काही ठिकाणी पोलिसांनी काठ्यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रशासनानं नागरिकांच्या आरोग्यासाठी घरी राहण्याचे आदेश देत लॉकडाऊन केलं असताना अशा प्रकारचे नियम मोडणाऱ्यांना पोलिसांनी धडा शिकवला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 804 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कराचीमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे.