मुंबई, 5 जानेवारी : लग्न हा आयुष्यातला एक मोठा बदल असतो. सध्या लग्नाचा सीझन सुरू झाला असून, अनेक जणांचे विवाह (Marriage) होत आहेत. लग्न करण्यासाठी दोघांमध्ये प्रेम असणं गरजेचं असतं, असं म्हटलं जातं. कारण, प्रेम ही भावना दोन हृदयांना जोडते. प्रेम हे वय किंवा बंधन पाहत नाही. प्रेम हे कुणावरही होऊ शकतं. म्हणूनच तर प्रेम हे आंधळ असतं असंही म्हटलं जातं. प्रेमात अनेकांनी परंपरा आणि बुरसटलेल्या विचारांना छेद देऊन धर्म आणि जातीचा भेदभाव दूर करून विवाह केले आहेत. तसंच समलिंगी विवाहांनादेखील मान्यता मिळाली आहे. अनेक मुलींनी मुलींशीच किंवा मुलांनी मुलांशीच लग्न केल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील; पण आज आम्ही तुम्हाला एका अजब लग्नाबद्दल (Unique Wedding) सांगणार आहोत. ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. एक अजब प्रेमकहाणी समोर आली आहे. लास वेगासमध्ये (Las Vegas) नवीन वर्षाच्या दिवशी एका स्त्रीने लग्न केलं आहे; पण हे लग्न तिने एका पुरुषाशी किंवा स्त्रीशी नाही, तर चक्क गुलाबी रंगाशी (Woman Marries Pink Colour) केलं आहे. किटेन के सेरा असं त्या तरुणीचं नाव आहे. किटेनला गुलाबी रंग खूप आवडतो. बहुतांश मुलींचा किंवा महिलांचा आवडता रंग ‘पिंक’म्हणजे गुलाबी असतो. प्रत्येक स्त्रीकडे तुम्हाला गुलाबी रंगाचे कपडे किंवा इतर वस्तू आढळतीलच; पण कोणी रंगासोबत लग्न केल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. किटेनला गुलाबी रंग एवढा आवडतो, की तिने गुलाबी रंगाशी लग्नच केलं आहे. गेल्या 40 वर्षांपासून आम्ही सोबत आहोत, असं ती म्हणाली. भव्य असा हा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नात उपस्थित सर्वांनीच गुलाबी रंगाचे कपडे घातले होते. गुलाबी रंगाशी लग्न करण्याची आयडिया दोन वर्षांपूर्वी एका लहान मुलाने दिल्याचं किटेनने सांगितलं. ‘दोन वर्षांपूर्वी एका लहान मुलाने मला, तुझं गुलाबी रंगावर प्रेम आहे का, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा मी त्याला ‘हो’ असं उत्तर दिलं. त्यावर मग त्याने मला गुलाबी रंगाशी लग्न करण्याची आयडिया दिली,’ असं किटेनने सांगितलं. तेव्हापासूनच गुलाबी रंगाशी लग्न करण्याची इच्छा झाल्याचं ती म्हणाली. आता दोन वर्षांनंतर तिने 2022च्या पहिल्याच दिवशी गुलाबी रंगाशी लग्न केलं आहे.
या भव्य आणि अनोख्या लग्नात किटेनने गुलाबी रंगाचा सुंदर असा गाऊन घातला होता. यासोबत तिने गुलाबी कोट, गुलाबी केस आणि गुलाबी रंगाचा मुकुटदेखील घातला होता. तिचे दागिनेदेखील गुलाबी रंगाचे होते आणि लग्नाचा केकसुद्धा गुलाबी रंगाचा होता. विशेष म्हणजे, या लग्नात तिने एक शपथदेखील घेतली. ती म्हणजे आयुष्यभर गुलाबी रंगाशिवाय दुसरा कोणताच रंग घालणार नाही. या अनोख्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रेम आंधळं असतं म्हणतात, याचं हे जिवंत उदाहरण पाहायला मिळालं आहे.