मुंबई, 27 फेब्रुवारी : टिकटॉकवर फेमस होण्यासाठी अनेक तरुण आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. अशातच एका टिकटॉक (Tiktok) स्टारचा भयंकर व्हिडिओ समोर आला आहे. लोकांचं लक्ष वेधून घेण्याच्या नादात हा स्टार मरता मरता वाचला आहे. टिकटॉकवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेला जॅसन क्लार्क हा तरुण टिकटॉक व्हिडिओ करताना मृत्यूच्या दारातून परतला आहे. बर्फ पडलेल्या एका नदीत टिकटॉक व्हिडिओ करण्यासाठी गेलेला जॅसन क्लार्क बर्फाच्या चादरखाली अडकला. बाहेर पडण्यासाठी त्याला वाटच मिळत नव्हती. आणखी काही क्षणाचा विलंब झाला असता तर त्याच्या जीवाचं बरं वाईट व्हायला वेळ लागला नसता, असंच व्हिडिओ पाहून लक्षात येतं. या सगळ्या प्रकाराबाबत स्वत: जॅसन क्लार्क यानेही भाष्य केलं आहे. ‘नदीतील बर्फाखाली मी अडकलो गेलो. बराच वेळ मी बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधत होतो, मात्र मला अपयश आलं. एका क्षणी तर मला वाटलं होतं की आपलं वाचणं आता अशक्य आहे,’ अशी प्रतिक्रिया जॅसन क्लार्क यांनं दिली आहे.
काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ शेअर करत जॅसन क्लार्कने त्याच्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला आहे. जॅसन क्लार्कचा हा व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत असून आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.