प्रतिकात्मक फोटो
कानपूर 28 ऑक्टोबर : काही लोक रस्त्यावरच्या भटक्या जनावरांना जाणीवपूर्वक त्रास देतात. सोशल मीडियावर या संबंधीचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या उत्तर प्रदेशातील कानपूरमधल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. कानपूर येथे दारुच्या नशेत असलेल्या काही लोकांनी गायीच्या तोंडात बॉम्ब फोडल्याचं समोर आलं आहे. यामुळे गायीचा जबडा पूर्णपणे फाटला असून, या गायीवर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहेत. पोलीस यंत्रणा या घटनेचा तपास करत असून, स्फोट नेमका कशानं झाला हे जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कानपूरमधील काकादेव परिसरातील एम ब्लॉकमध्ये दारुच्या नशेत असलेल्या काही लोकांनी शुक्रवारी भटक्या गायीच्या तोंडात बॉम्ब लावून फोडला. यामुळे गायीचा जबडा फाटला आहे. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवली. हे ही पाहा : Viral Video : आधी गाईला लाथ मारली मग शेपूट खेचली… त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं दरम्यान, तोंडात बॉम्ब फुटल्याने गायीचा जबडा फाटून रक्तबंबाळ झाला. लोकांनी या गायीचा फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या फोटोवर लोकांनी कमेंट केल्या आहेत. ही घटना माणुसकीला लाजवेल अशी आहे, अशा स्वरुपाच्या कमेंट लोकांनी या फोटोवर केल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक लोकांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी महानगरपालिकेच्या टीमला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या जनावरे पकडणाऱ्या पथकाने या जखमी गायीला उपचारांसाठी रायपुरवा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. ‘जखमी गायीवर उपचार सुरू आहेत.’ अशी माहिती महापालिकेचे मुख्य पशु चिकित्सा अधिकारी डॉ. आर. के. निरंजन यांनी दिली आहे. “कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ चरत असताना झालेल्या स्फोटात एक गाय जखमी झाली आहे. हा स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. सध्या या जखमी गायीवर पशु चिकित्सालयात उपचार सुरू आहेत,.” असे पोलीस आयुक्त बी.पी. जोगदंड यांनी सांगितलं.
या घटनेविषयी लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकांनी सोशल मीडियावरही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.