भोपाळ, 1 फेब्रुवारी : इंदूरमध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू झाला आहे. मृतक विद्यार्थी हा बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. मृतक विद्यार्थी बसमध्ये चढताना बस ड्रायव्हरने न पाहता बस सुरु केली, त्यानंतर लगेच वेग वाढवल्याने ही दुर्देवी घटना घडली. संबंधित हृदयद्रावक घटना ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे उभे राहतील. संबंधित घटना ही इंदूरच्या भंवरकुआ पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. मृतक विद्यार्थी आपल्या भावासह कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. कॉलेजला जाण्यासाठी ते बसने प्रवास करणार होते. त्यासाठी ते नियमितच्या ठरलेल्या बस स्टॅण्डवर आले होते. यावेळी बस तिथे आली. मृतक विद्यार्थ्याचा भाऊ बसमध्ये चढला. त्यानंतर मृतक मुलगा हा बस चढू लागला. पण यावेळी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्देवी घटना घडली. बसचालकाने बस चालू करताना मागेपुढे बघितलं नाही. त्याने बसमध्ये प्रवासी चढत आहेत की नाही, याबाबत शहानिशा केली नाही. बसचालकाने गाडी सुरु केली. त्यानंतर लगेच गाडीचा वेग वाढवला. यावेळी मृतक विद्यार्थी हा गाडीवर चढत होता. तो गाडीच्या दरवाज्यावर चढला, पण गाडीने वेग धरताच त्याचा गाडीखाली तोल गेला. त्यानंतर त्याच्या अंगावरुन बसचं दुसरं चाक गेलं.
( मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर स्फोटकांचा साठा जप्त, 3 जणांना अटक ) विद्यार्थ्याच्या अंगावरुन गाडी गेल्याने तो रस्त्यावर वेदनांनी व्हिव्हळत होता. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याला रस्त्यावर पडताना बघितल्यानंतर त्यांनी तातडीने त्याच्याजवळ धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. त्या विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली होती. या अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी आणि मृतक विद्यार्थ्याच्या भावाच्या जबाबानुसार संबंधित बसच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.