नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : लहान मुलांची आकलनक्षमता खूप चांगली असते. एखादी गोष्ट लहानपणी शिकवली, तर मुलं त्यात लवकर प्रावीण्य मिळवतात; मात्र तरीही मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषा शिकणं, त्यातलं एखादं पुस्तक वाचणं ही अतिशय अवघड गोष्ट असते. ते साध्य करणाऱ्या मुलांची बुद्धिमत्ता असामान्य असते. अशाच असामान्य बुद्धिमत्तेची झलक केरळ राज्यातल्या कोळिकोडेमधल्या एका मुलीमध्ये दिसली आहे. चौथीत शिकणाऱ्या एका हिंदू मुलीने कुराण पाठांतराच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
भाषा हे संवादाचं माध्यम असतं. लहानपणापासून जी भाषा कानावर पडते, ती भाषा मुलं लगेच आत्मसात करतात. असं असलं, तरी प्रयत्नपूर्वक शिकूनही काही भाषा आत्मसात करता येतात. केरळमधल्या चौथीत शिकणाऱ्या पार्वतीने लहानपणीच अरेबिक भाषा शिकायला सुरुवात केली. तिला पर्वणा ही एक जुळी बहीणही आहे. दोघींनाही अरेबिक भाषा उत्तम येते.
हे ही वाचा : कसे असतात डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक, पाहा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास पैलू
चेम्मरथर एलपी स्कूलमध्ये दोघी शिकतात. कोळिकोडेमधल्या थोडन्नूर उपजिल्हा कला उत्सवात कुराण पाठांतराची एक स्पर्धा घेण्यात आली. त्यात पार्वतीला अ श्रेणीसह पहिला क्रमांक मिळाला. विशेष गोष्ट अशी, की कुराण पाठांतर स्पर्धेत भाग घेऊन जिंकणारी पार्वती ही हिंदू कुटुंबातली आहे. अरेबिक भाषेवरचं तिचं प्रभुत्व पाहून सगळेच जण अवाक झालेत. या वयात इतकी उत्तम अरेबिक भाषा येण्यामागे रुकय्या या त्यांच्या शाळेतल्या शिक्षिकेचा मोठा वाटा आहे.
पार्वतीच्या आई-वडिलांनी तिला दुसरी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पार्वतीचे वडील नलीश बॉबी कोळिकोडेमध्ये आयटी क्षेत्रामध्ये काम करतात, तर आई दिनप्रभा इंग्रजीची शिक्षिका आहे. आपल्याला माहीत असलेली एखादी वेगळी भाषा शिकणं हे नेहमी प्रोत्साहन देणारं असतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
कुराण हा मुस्लिम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ आहे. हा मूळ ग्रंथ अरेबिक भाषेत असून त्यात धर्माबाबत अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा ग्रंथ वाचणं व पाठ करणं ही अतिशय अवघड असणारी गोष्ट केरळमधल्या या मुलीने साध्य केली आहे. ती मुलगी हिंदू असूनही तिने संपूर्ण कुराण पाठ केलं आहे.
हे ही वाचा : 30 वर्षांनंतर शनीदेव कुंभ राशीत, साडेसातीच्या फेऱ्यात अडकलेल्यांना असा होईल लाभ
मातृभाषेव्यतिरिक्त एखादी भाषा शिकणं ही खूप कठीण गोष्ट असते. त्या भाषेच्या लिपीपासून उच्चारापर्यंत सर्व काही नव्यानं शिकावं लागतं; मात्र बालवयात शिकवलेल्या अनेक गोष्टी पटकन आत्मसात होतात व दीर्घ काळ स्मरणात राहतात. त्यामुळेच कोळिकोडेमधली ही मुलगी अरेबिक भाषेतला कुराण हा धर्मग्रंथ पाठ करू शकली. तिच्या यशाबद्दल अनेकांकडून तिचं कौतुक केलं जात आहे.