ट्रॅफिकमध्ये हार्ट शेप लाइट.
बंगळुरू, 13 ऑक्टोबर : ट्रॅफिक सिग्नलवर सामान्यपणे तीन लाइट्सच असतात. लाल, हिरवी आणि पिवळी. शिवाय यामध्ये तुम्ही याच रंगाचं बाणाचं चिन्ह पाहिलं असेल जे दिशा दर्शवतं. पण सध्या सोशल मीडियावर अशा ट्रॅफिक सिग्नलचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात धडधडतं हृदय दिसतं आहे. म्हणजे यामध्ये लाल रंगाचा हार्ट शेप दिसतो आहे. आता नेमका याचा अर्थ काय, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. हार्ट शेप ट्रॅफिक लाइट्सने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रॅफिक सिग्नलमध्ये हा हार्टचा आकार का आहे, अशी ट्रॅफिक लाइट्स कुठे आहे, असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. तुम्हालासुद्धा हा फोटो पाहून असेच प्रश्न पडले असतील. तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या अनोख्या ट्रॅफिक सिग्नलचे हे फोटो कर्नाटकच्या बंगळुरूतील आहे. शहरातील 20 जंक्शनवरील ट्रॅफिक सिग्नलवर असा हार्ट शेप दिसेल. एएनआयनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर याचे फोटो शेअर केले आहेत. हे वाचा - VIDEO - नव्या बाईकशेजारी उभी राहिली वाईफ; नवऱ्याने जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही एएनआयच्या रिपोर्टनुसार बंगळुरूत हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला जातो आहे. रस्त्यावरील ट्रॅफिक लाइटमध्ये हार्ट शेपचा वापर करून लोकांना हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
एएनआयच्या ट्विटनुसार जॉईंट सीपी (वाहतूक) आर. गौडा यांनी सांगितलं, की वाहतूक पोलीस मणिपाल हॉस्पिटलसह मिळून हृदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाअंतर्गत 15 ते 25 ऑक्टोबरपर्यंत शहरातील 20 जंक्शनवरील ट्रॅफिक सिग्नलवर हार्ट दिसेल.