नवी दिल्ली, 20ऑगस्ट : आरोग्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढली आहे. निरोगी राहण्यासह आपलं व्यक्तिमत्व सर्वांमध्ये खुलून दिसावं म्हणून सुडौल शरीरयष्टी (Body Shape) कमावण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ असते. त्यामुळे जिममध्ये (Gymnasium) जाऊन व्यायाम करण्यावर खूप जणांचा भर असतो. योग्य सल्ला न घेता व्यायाम करत राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. बायसेप्सचा व्यायाम करताना एका व्यक्तीच्या दंडातील शिरा फाटल्या आणि जीव वाचवण्यासाठी त्याचा हातच कापावा लागला. या संदर्भात त्या व्यक्तीनंच सोशल मीडियावर स्वत:चा अनुभव शेअर केलाय. गाबे लिएचके (Gabe Lieschke) हा नियमित जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा. जास्त वजन उचलून बायसेप्सचा व्यायाम करताना त्याच्या दंडातील शिरा फाटल्या. डॉक्टरांनी त्याला आरामाचा सल्ला दिला. तरीही तो न ऐकता जिममध्ये जात होता. परिणामी, त्याच्या दंडातील संसर्ग (Infection) वाढत गेला आणि त्याचा हात कापावा लागला. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगातून बोध घेत इतरांना जागरूक करण्यासाठी गाबेने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. स्वत: केलेल्या चुका इतरांनी करून पश्चाताप करून घेऊ नये या हेतूने ही पोस्ट असल्याचं त्यानं सांगितलं. आवश्यकतेपेक्षा अधिक व्यायाम ठरेल जीवघेणा गाबेने त्याचा अनुभव सांगताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या. जीममध्ये व्यायाम करताना आवश्यकतेपेक्षा अधिक वजन उचलल्यामुळे दंडातील शिरांवर ताण पडला व त्या फाटल्या. दुखणं वाढल्यानंतर गाबेला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला काही महिने आराम करण्याचा सल्ला दिला. पण पूर्ण बरा होण्याची प्रतीक्षा न करता जिममध्ये जाणं त्यानं पसंत केलं. परिणामी, त्याच्या दंडातील संसर्ग वाढतच गेला. त्यामुळे त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. अखेर त्याचा जीव वाचावा म्हणून डॉक्टरांना त्याचा हात कापावा लागला. अनेक दिवस कोमात गेला गाबे अति व्यायामामुळे हात गमावल्यानंतर लोकांना जागरूक करण्यासाठी गाबेनं यंग ब्लड - मेन्स मेंटल हेल्थ पॉडकास्टवर (Young Blood-Men’s Mental Health Podcast) त्याचे अनुभव शेअर केले. व्यायाम करताना झालेल्या दुखापतीमुळे आपण मृत्युला फार जवळून पाहिल्याचं त्यानं म्हटलंय. व्यायाम करताना झालेल्या दुखापतीनंतर अनेक दिवस गाबे कोमात होता. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा एक हात नसल्याचं त्याला दिसलं. एनएचएस (NHS) वेबसाइटनुसार, गाबेला झालेल्या संसर्गाला नेक्रोटायझिंग फॅसिटिज (Necrotizing Fasciitis) असं नाव आहे. हा दुर्मिळ प्रकारचा संसर्ग आहे. यात जखमेवरील संसर्ग वाढतच जातो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, गाबेनं आराम केला असता तर त्याचा हात कापण्याची वेळ आली नसती.