मुंबई, 14 ऑक्टोबर : दोन दिवसांपूर्वी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी नव्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्यांनी बर्न्ट हेअर हा नवा परफ्यूम लाँच केला. त्यासाठी ट्वीटरवर त्यांनी आपला बायो बदलून ‘परफ्यूम सेल्समन’ असं लिहिलं. तसंच परफ्यूम विकत घेण्याचं आवाहनही त्यांनी फॉलोअर्सना केलं. त्याला ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. कारण 4 तासांमध्येच या परफ्यूमच्या 10 हजार बाटल्या विकल्या गेल्या. मस्क यांच्या नव्या बर्न्ट हेअर परफ्यूमनं विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे. या परफ्यूमच्या एका बाटलीची किंमत 100 डॉलर म्हणजे 8400 रुपये आहे. द बोरिंग कंपनीच्या वेबसाइटवरून हा परफ्यूम खरेदी करता येऊ शकतो. डॉजकॉइन या क्रिप्टोकरन्सीद्वारे याचं शुल्क भरता येतं. या परफ्यूमची मागणी अजूनही वाढतेच आहे. त्यावर एलॉन मस्क यांचं म्हणणं आहे, की परफ्यूमच्या 10 लाख बाटल्या विकल्या गेल्या, तर त्याची बातमी होईल का हे पाहिलं पाहिजे. हे परफ्यूम सर्वांसाठी आहे. पुरुष व स्त्रिया कोणीही याचा वापर करू शकतं, असंही त्यांनी सांगितलं. या परफ्यूमचं वर्णन करताना वेबसाईटवर ‘द इसेन्स ऑफ रिपग्नंट डिझायर’ असं लिहिण्यात आलंय. ‘ज्याप्रमाणे जेवणाच्या टेबलवर मेणबत्ती कोणत्याही कष्टाशिवाय जळून जाते,’ तसाच हा परफ्यूम असेल असं कंपनीचं म्हणणं आहे. तसं वर्णन त्यांनी उत्पादनाची माहिती देताना लिहिलं आहे. याशिवाय ‘विमानतळावर गेल्यावर तुमच्याकडे लक्ष जाईल,’ असंही यात म्हटलंय. यावरून या परफ्यूमचं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मस्क यांच्या ट्विटर खरेदीचा वाद अजून प्रलंबित आहे. हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. मस्क यांना 44 अब्ज डॉलरच्या ट्विटर कंपनी खरेदीच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देता यावं, यासाठी गेल्या आठवड्यात डेलावेअर न्यायालयानं हे प्रकरण प्रलंबित ठेवलं. गेल्या 3 महिन्यांपासून मस्क त्यांच्या खरेदीप्रस्तावापासून माघारी हटण्याचा प्रयत्न करत आहेत. मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदीसाठी आता नवा प्रस्ताव दिला आहे. ट्विटर कंपनी 54.20 डॉलर प्रती शेअर या दरानं खरेदी करण्याचा हा प्रस्ताव आहे. दरम्यान, परफ्यूम विक्रीच्या नव्या व्यवसायात त्यांनी पाऊल ठेवलं आहे. त्यासाठी मार्केटिंगही जोरदार सुरू केलं आहे. त्यामुळेच काही तासांमध्येच परफ्यूमच्या हजारो बाटल्या विकल्या गेल्या आहेत.