मुंबई, 8 फेब्रुवारी : लग्नसमारंभ (Marriage Ceremony) म्हणजे सगळ्यांसाठीच एक आनंदाचा, उत्साहाचा प्रसंग असतो. केवळ दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबं एका नात्याने बांधली जातात. प्रत्येकासाठीच लग्नसोहळा हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. आकर्षक सजावट, सुंदर कपडे, दागिने घालून नटून-सजून वावरणारे नातेवाईक, पाहुणे यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. या दिवशी सगळ्यांचं लक्ष असतं ते या सोहळ्याच्या उत्सवमूर्तींकडे म्हणजे वधू-वरांकडे (Bride and Groom). वर-वधूच्या प्रवेशापासून ते निरोपापर्यंत सगळ्यांच्या नजरा या दोघांवरच खिळलेल्या असतात. वर-वधूही एकमेकांना या सोहळ्यासाठीच्या खास पोशाखात पाहण्यासाठी आतुर असतात. सगळ्यांच्या नजरा चुकवून त्यांची होणारी नजरानजर, मित्रमंडळींची चेष्टामस्करी, जमलेल्यांचे हास्यविनोद यामुळे सर्वत्र एका उत्साहाचं वातावरण असतं. अशाच एका लग्नसमारंभात एका वधूनं स्टेजवर जाण्याआधी नवरदेवाला एक अजब अट घातली आणि वर येण्यास नकार दिला. त्यांच्यातल्या या खट्याळ प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नसमारंभात सर्वांत महत्त्वाचा विधी असतो तो म्हणजे वर-वधूनं एकमेकांना हार घालण्याचा. या वेळी सर्व उपस्थित मान्यवर अक्षता किंवा फुलांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देतात. या विधीसाठी स्टेजवर नवरा उभा असतो आणि नवरीच्या वेशात सजलेली वधू हातात जयमाला घेऊन येते. वधूच्या या आगमनाची सर्व जण आतुरतेनं वाट पाहत असतात. एका विवाहसोहळ्यातला याच प्रसंगाचा हा व्हिडिओ आहे.
यात लाल रंगाच्या आकर्षक वधूवेशात सजलेली सुंदर अशी वधू (Bride) स्टेजकडे येताना दिसते. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या आहेत. नवरदेवही आतुरतेनं तिची वाट बघत आहे. अनिमिष नजरेनं तिचं हे रूप न्याहाळत असतानाच ती मात्र स्टेजजवळ येताच वर चढण्यास नकार देते आणि वरानं तिला उचलून स्टेजवर न्यावं किंवा खाली उतरून येऊन तिचा हात धरून स्टेजवर न्यावं, अशी मागणी करते. वधूसोबत तिच्या बहिणी आणि मैत्रिणीही आहेत. तिच्या मागणीपुढे अखेर नवरदेवानं मान झुकवली आणि वधूला उचलण्यासाठी खाली उतरला तेव्हा मात्र तिनं मिश्कीलपणे त्याला सतवायला सुरुवात केली. त्याने तिचा हात धरण्यासाठी हात पुढे करताच ती त्याच्या हातात आपला हात येऊ देत नव्हती. काही वेळ ही गंमत सुरू राहिल्यानंतर मात्र वधूने नवरदेवाच्या विनंतीला होकार दिला आणि स्टेजवर जाण्याचं मान्य केले. वधू-वरांचा हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून, लोकांना तो खूपच आवडला आहे. इन्स्टाग्रामवर वेडिंग वर्ल्ड ( WeddingzWorld) नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. सुमारे 26 हजार जणांनी हा व्हिडिओ लाइक केला असून, त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युझर्सनी या व्हिडिओवर (Instagram Reels Video) प्रतिक्रियादेखील दिली आहे.