मुंबई, 8 जुलै : जपानचे माजी मुख्यमंत्री शिंजो आबे (Shinzo Abe Death) यांनी आयुष्याची लढाई गमावली आहे. जपानमधील नारा शहरात भाषण करत असताना आबे यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या, असं वृत्त जपानी माध्यमांनी दिलं होतं. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तब्बल 6 तास त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर, उपचाराच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ‘हा हल्ला दुर्दैवी असून हे प्रकार सहन केले जाणार नाहीत’ अशी प्रतिक्रिया जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी व्यक्त केली आहे. जपानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारो शहरामध्ये शिंजो आबे भाषण करत होते. त्यावेळी आरोपीनं पाठीमागून त्यांच्याशी संपर्क केला आणि अचानक गोळी झाडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. जपानी पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
हा हल्लेखोर 42 वर्षांचा असून तो यापूर्वी जपानच्या लष्करात होता अशी माहिती रॉयटर्सनं दिली आहे. त्यानं हा हल्ला का केला? याबाबतची माहिती अजून समजलेली नाही. जपानी पोलीस त्याची चौकशी करत आहेत. गोळीबाराचा थरारक VIDEO आला समोर; भाषण करणारे शिंजो आबे बोलता-बोलता कोसळले शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. भारताशी संबंध चांगले करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. आक्रमक नेते अशी आबे यांची ओळख होती. ते सलग 2803 दिवस (7 वर्ष 6 महिने) जपानचे पंतप्रधान होते. त्यांनी 2020 साली प्रकृतीच्या कारणामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. जपानचे सध्याचे पंतप्रधानही आबे यांच्याच पक्षाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून 9 जुलै रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.