लंडन, 18 मे : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कोरोना रुग्णांसाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावत आहेत. जगात आतापर्यंत अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. ब्रिटनमध्ये 78 वर्षीय कोरोना योद्धा महिलेनं शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णांची सेवा केली. लंडनच्या ज्या रुग्णालयात ती नर्स म्हणून काम करत होती तिथंच कोरोनामुळे तिचा मृत्यू झाला. सोफी फगन यांच्या अंत्ययात्रेवेळी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सेवेचा गौरव करत टाळ्या वाजवून शेवटचा निरोप दिला. सोफी यांचा मृतदेह घेऊन जाणारी गाडी जात असताना रस्त्याच्या दुतर्फा कर्मचारी रांगेत उभे होते. त्यांनी टाळ्या वाजवत सोफी फगन यांना श्रद्धांजली वाहत निरोप दिला. लंडनमधील होमर्टन रुग्णालयात सोफी फगन या नर्स होत्या. रुग्णालयात त्या कोरोनाग्रस्तांची सेवा करत होत्या. गेल्या 5 दशकांपासून त्या नर्स आणि केअर टेकरची नोकरी करत होत्या. त्यांनी कोरोना साथीच्या काळात रुग्णांच्या सेवेसाठी निवृत्ती घेण्यासही नकार दिला होता. कोरोना रुग्णाची सेवा करत असतानाच सोफी यांनाही कोरोनाची लागण झाली. ज्या रुग्णालयात त्यांनी आयुष्यभर इतर रुग्णांची सेवा केली त्याच ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
ट्विटरवर सोफी यांच्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये रस्त्यावर NHS च्या सहकाऱ्यांनी केलेली गर्दी दिसत आहे. लोक रांगेत उभा राहून त्यांना निरोप देत आहेत. हे वाचा : कोरोनाच्या संकटात रुग्णालयांची अवस्था बिकट, नोकरी सोडून नर्स जात आहेत घरी एका युजरनं म्हटलं की, होमर्टन रुग्णालयाचे सर्व लोक त्यांच्या प्रिय आणि सर्वात जुन्या सहकारी सोफी फगन यांनी 78 व्या वर्षी कोरोनाशी दिलेल्या लढ्याबद्दल निरोप देत आहे. सोफी फगन यांनी 1966 मध्ये इस्टर्न हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायला सुरुवात केली होती. हे वाचा : Lockdown मध्ये आजारी बापासह सायकलवरुन लेकीने केला 7 दिवसात 1000 किमी प्रवास