इस्लामाबाद 29 ऑक्टोबर: जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा इथं झालेला हल्ला (Pulwama attack) हा आम्हीच घडवला. इम्रान खान (Pakistan PM Imran Khan)सरकारचं ते सगळ्यात मोठं यश आहे अशी कबुली पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या मंत्र्यानेच अशी कबुली दिल्याने खळबळ उडाली असून पाकिस्तानचा दहशतवादी घटनांमधला सहभाग पुन्हा एकदा उघड झाला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे आणि त्याचे भारताकडे पुरावे आहेत असा भारताचा दावा होता. त्यावर पाकिस्तानने ते कधीच मान्य केलं नाही. मात्र आता खुद्द सरकारच्या मंत्र्यानेच ती कबुली दिल्याने पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाल्याचं म्हटलं जातं. पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला भारताचा पायलट कॅप्टन अभिनंदनला सोडलं नाही तर भारत रात्री 9 वाजता पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असं परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी त्यावेळी एका बैठकीत सांगितलं होतं असा दावा पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते अयाज सादिक यांनी केला होता. त्यामुळे भीतीने पाकिस्तानने अभिनंदनची सुटका केली अशी इम्रान खान यांच्यावर टीका होऊ लागली. त्या टीकेला उत्तर देताना चौधरी म्हणाले, की पुलवामा हल्ला हा पाकिस्तानचं मोठं यश आहे आणि त्याचं श्रेय इम्रान खान यांना दिलं पाहिजे. भारताने नाही तर आम्हीच भारताला घरात घुसून मारलं अशी मुक्ताफळही त्यांनी उधळली.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातल्या बालाकोटमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारताच्या सीमांचं उल्लंघन केलं होतं त्या विमानांना पिटाळून लावताना वर्धमानचं विमान पाकिस्तानात कोसळलं होतं आणि तो पकडला गेला होता. पाकिस्तानने 1 मार्च 2019 मध्ये अभिनंदनला भारताच्या स्वाधीन केलं होतं.
एअरस्ट्राईक नंतर भारत मोदी सरकारबद्दल पाकिस्तानमध्ये एकप्रकारची भीती निर्माण झाली होती. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी याची कबुली दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तान विधानसभेचे माजी सभापती अयाज सादिक म्हणाले, ‘पाकिस्तान लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते आणि भारताकडून आक्रमण होण्याच्या भीतीनं डोक्यावर घाम फुटला होता. बाजवा यांना भारताकडून हल्ला होईल याची भीती वाटत होती. या भीतीपोटी विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं सोडलं.’