स्वित्झर्लंडमध्ये समलैंगिक जोडप्यांच्या (Switzerland allows same sex marriages) लग्नाला मान्यता देण्यात आली आहे. 2007 साली समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यात एक पाऊल पुढे टाकत आता त्यांच्या विवाहालादेखील स्वित्झर्लंडनं मान्यता दिली आहे. या देशात दर वर्षी सुमारे 700 जोडपी एकत्र राहण्यासाठी रजिस्ट्रेशन करत असतात.
समलैंगिक लग्नाला मान्यता देण्याबाबत रविवारी स्वित्झर्लंडमध्ये एक जनमत चाचणी घेण्यात आली. देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला समलैंगिक जोडप्यांच्या लग्नाला कुठलाही आक्षेप नसल्याचं त्यातून समजलं.
स्वित्झर्लंड सरकारनं दिलेल्या माहितीनुसार देशातील 64 टक्के लोकांनी समलैंगिक विवाहाचं समर्थन केलं, तर 36 टक्के नागरिकांनी याला विरोध दर्शवला. सुमारे दोन तृतीयांश नागरिकांनी समलैंगिक विवाहाला कुठलाही आक्षेप नसल्याचं मत नोंदवलं.
याचा निकाल जाहीर झाल्यानंतर समलैंगिक जोडप्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. स्वित्झर्लंडच्या सरकारनं या कायद्याची अधिकृत घोषणा केली.
2007 सालीच स्वित्झर्लंडनं समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली होती. इतर जोडप्यांप्रमाणे सर्व अधिकार आता समलैंगिक जोडप्यांना मिळाले आहेत. त्यामुळे एकत्र राहण्यापासून मुल दत्तक घेण्यापर्यंत सर्व बाबी त्यांना करता येतील.
या जनमत चाचणीपूर्वीदेखील सरकारने सर्वांना समान अधिकार मिळावेत आणि समलैंगिक जोडप्यांना इतरांप्रमाणेच वागणूक मिळावी, यासाठी मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन केलं होतं. तर परंपरावादी नागरिकांनी 50 हजार जणांच्या सह्या गोळा करत या निर्णयाला विरोध केला होता.
ख्रिश्चन समुहातील काही गट आणि स्विस पीपल्स पार्टी या मोठ्या पक्षानं मात्र या निर्णयाला विरोध केला आहे.
स्वित्झर्लंडनं 1942 सालीच समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र स्थानिक पोलिसांकडून 1990 च्या दशकापर्यंत समलैंगिकांचं रेकॉर्ड ठेवलं जात होतं.
2007 साली समलैंगिकांना एकत्र राहण्याचा अधिकार मिळाला होता, मात्र लग्नाचा अधिकार त्यांना नव्हता. आता मात्र त्यांना इतरांप्रमाणे सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात स्वित्झर्लंडच्या संसदेतही या विषयावर चर्चा आणि मतदान पार पडलं होतं.
जनमत चाचणीच्या निकालाचा संदर्भ घेत आता या विधेयकाचं लवकरच अधिकृतरित्या कायद्यात रुपांतर होणार आहे.