कीव, 27 फेब्रुवारी: युक्रेनमधून (Ukraine) एक मोठी बातमी समोर येत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine) सुरू असलेल्या युद्धात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. युक्रेनचे गव्हर्नर दिमित्री झिवित्स्की यांनी सांगितलं की, रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 7 वर्षांच्या मुलीसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील लढाईत किमान 240 नागरिकांचा मृत्यू झाल्याची संयुक्त राष्ट्रानं पुष्टी केली आहे. त्यापैकी गुरुवारी किमान 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान त्यांचा विश्वास आहे की वास्तवात संख्या खूप जास्त आहे. कारण अनेक घातपाताच्या वृत्तांची पुष्टी होणं बाकी आहे. लष्करी तळ आणि विमानतळांवर रशियाचा ताबा रशियाचे सैन्य युक्रेनमधील खार्किवमध्ये दाखल झालं आहे. तेथे त्यांनी लष्करी तळ आणि विमानतळ ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रशियन सैन्य आता युक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्याच्या तयारीत आहे. रशियाने स्लोवेनियाच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द केली बंद रशिया लिथुआनिया, लातविया, एस्टोनिया आणि स्लोवेनियाच्या विमानांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करत आहे, हे युक्रेनवरील हल्ल्यानंतर मॉस्कोच्या पश्चिमेकडील संबंधांमध्ये आणखी बिघाड दर्शवणारे एक पाऊल आहे.
रशियाच्या राज्य हवाई वाहतूक एजन्सी, रोसावियात्सियाने रविवारी पहाटे घोषित केलं की, हे पाऊल चार देशांनी रशियन विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्याच्या विरोधात आहे. एजन्सीने शनिवारी रोमानिया, बुल्गारिया, पोलंड आणि झेक प्रजासत्ताकमधील विमानांसाठी रशियन हवाई क्षेत्र बंद केल्याचा अहवाल दिला. याआधी डोनेटस्कमध्ये गोळीबारात 19 नागरिक ठार युक्रेनमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, शनिवारी पूर्व युक्रेनच्या डोनेटस्क भागात रशियन गोळीबारात 19 नागरिक ठार आणि 73 जखमी झाले आहेत. इंटरफॅक्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातील ताज्या घडामोडींनुसार रशियन सैनिकही युक्रेनच्या नागरिकांना लक्ष्य करत आहेत. इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेनं स्थानिक युक्रेनियन अधिकारी पावेल किरिलेन्को यांच्या हवाल्यानं सांगितलं की, शनिवारी रशियन गोळीबारात 19 नागरिक ठार आणि 73 जखमी झाले. पूर्व युक्रेनच्या डोनेटस्क भागात ही घटना घडली. डोनेटस्क प्रदेश हा युक्रेनचा फुटीरतावादी प्रदेश आहे. रशियानं यापूर्वीच या प्रदेशाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं आहे.