मेक्सिकोमध्ये (Mexico) 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Earth Quake) झाला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या भूकंपाचं केंद्र अकापुल्कोपासून 17 किलोमीटरवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ संशोधन विभागानं सांगितलं आहे.
भूकंप झाल्यानंतर अनेक नागरिक घरातून बाहेर आले. या भूकंपात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा सर्वाधिक परिणाम गुएरेरो राज्यातील अकापुल्कोमध्ये जाणवला. अनेक घरांची पडझड झाली, तर मोठमोठे दगड रस्त्यावर आले होते. लोकांनी घाबरून रस्त्यावर रात्र काढली.
भूकंपामुळे डोंगरांना हादरे बसले असून अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती मेक्सिकोचे पंतप्रधान मॅन्युएल लोपेज यांनी दिली आहे.
सरगियो फ्लोर्स नावाच्या एका नागरिकाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्याने इमारतीतून किंकाळ्या ऐकल्या आणि खिडकीतून अनेक वस्तू खाली पडताना पाहिल्या. आम्हाला त्सुनामी आल्याची भीती वाटली. मात्र नंतर या भूकंपाचा त्सुनामीशी संबंध नसल्याचं सांगण्यात आलं.
या भूकंपामुळे समुद्राच्या पातळीत किंवा लाटांमध्ये कुठलाही बदल झालेला नसून चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.