पाकिस्तान,07 जून: आज सकाळी पाकिस्तान (pakistan) मध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. डहारकी भागात दोन ट्रेनची (train accident) एकमेकांना धडक बसल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय. समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या दुर्घटनेत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. मिल्लत एक्सप्रेस आणि सर सैय्यद एक्सप्रेस या दोन एक्सप्रेसची एकमेकांना धडक झाली. पाकिस्तानात घोटकी मधील रेती आणि डहरकी रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाला. लाहोरच्या दिशेनं जाणारी सर सय्यद एक्सप्रेस गाडी कराचीहून सरगोधाकडे जाण्यासाठी निघालेल्या मिल्लत एक्स्प्रेसला धडकली.
पाकिस्तान मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, घोटकीचे उपायुक्त उस्मान अब्दुल्ला यांनी सांगितलं की, या रेल्वे अपघातात 30 जण ठार झाले तर 50 जण जखमी झालेत. अब्दुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 13 ते 14 बोगी रुळावरून घसरल्या आहेत. अनेक प्रवासी अद्याप अडकले असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. जखमींना वैद्यकीय मदत करण्यासाठी मेडिकल कॅम्प उभारण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.