कराची, 11 जुलै : राज्यात उशीराने आगमन झालेल्या पावसाने (Monsoon rain update) आता जोर पकडला आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पण, यापेक्षाही भयानक स्थिती आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तानच्या (Pakistan) कराची शहराची (karachi rain) झाली आहे. संपूर्ण शहर जलमय झालं असून वाहतूक ठप्प झाली आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कराचीमध्ये गेल्या तीन दिवसांत पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 14 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी विजेच्या धक्क्याने चार जणांचा मृत्यू झाला तर इतर दोघांचा बुडून मृत्यू झाला, अशी माहिती शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली. कराची आणि सिंध प्रांतातील इतर भागात शनिवारी जोरदार वारा आणि गडगडाटी वादळासह मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे शहरात पुराचा धोका वाढला, असे डॉनने वृत्त दिले आहे. या पावसामुळे कराची शहरातील लोक घरातच अकडून पडले आहे.
आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू पाकिस्तान हवामान विभागाचे (PMD) मुख्य हवामानशास्त्रज्ञ सरदार सरफराज यांनी डॉनला सांगितले की, कराची आणि सिंधच्या इतर भागांमध्ये पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूनचा प्रवाह जोरदार आहे. शनिवारी एका ट्विटमध्ये, हवामान बदल मंत्री शेरी रहमान म्हणाले की, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात 30 वर्षांच्या सरासरीपेक्षात अत्यंत उच्च पातळीचा पाऊस बरसत आहे. पाकिस्तानात गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे किमान 97 जणांचा मृत्यू झाला असून 101 जण जखमी झाले आहेत, असे देशाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले.