नवी दिल्ली : जगभरात कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्स व्हायरसचा धोकाही वेगानं वाढत आहे. मंकीपॉक्सचे भारतात तीन रुग्ण आढळले होते. तर संशयित तीन रुग्ण होते. कोरोनाची रुग्ण संख्या कमी होईपर्यंत मंकीपॉक्सचा धोका वाढला. आता मंकीपॉक्ससोबत पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. भारतात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत आहे. मंकीपॉक्सचा अलर्ट आहे. तर दुसरीकडे जगभरात कोरोनासोबत मंकीपॉक्सनेही थैमान घातलं आहे. जगभरात 80 देशांमध्ये मंकीपॉक्सने धुमाकूळ घातला आहे. हा आजार वेगानं पसरत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. कॅनडामध्ये मंकीपॉक्सच्या हजारहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पब्लिक हेल्थ एजन्सी ऑफ कॅनडाने दिलेल्या माहितीनुसार देशात मंकीपॉक्सच्या 1,059 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ओंटारियोमध्ये 511, क्यूबेकमध्ये 426, कोलंबियात 98, अल्बर्टा इथे 19, सस्काचेवानमधील तीन आणि युकॉनमध्ये दोन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मंकीपॉक्स या आजारात ताप येतो आणि त्यासोबत अंगावर फोड येतात. हा संसर्गजन्य आजार आहे. मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना याचं संक्रमण होतं. त्यामुळे मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांना आयसोलेट केलं जातं. त्यांच्या अंगावर रॅश किंवा फोड येतात. हा व्हायरस ७ ते १४ दिवसांपर्यंत राहातो.