इस्लामाबाद, 11 मार्च: भारतानं (India) मिसाईल डागल्याचा दावा पाकिस्ताननं (Pakistan) केला आहे. एवढंच नाही तर भारतनं डागलेलं मिसाईल त्यांच्या पंजाब प्रांतात पडल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्करानं (Pakistani Army) गुरुवारी म्हटलं की, पंजाब प्रांतात पडलेलं मिसाईल भारताकडून आमच्या हवाई हद्दीत येत असल्याचं आढळलं आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.43 वाजता एक अतिवेगवान वस्तू भारतीय हद्दीतून उडाली आणि आपला रस्ता चुकवून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तिथे येऊन पडली. यामुळे नागरिकांचे काही नुकसान झालं. मात्र त्यात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. भारतानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मेजर जनरल इफ्तिखार यांनी सांगितलं की, बुधवारी रात्री पंजाबमधील खानेवाल जिल्ह्यातील मियां चन्नू भागात अज्ञात वस्तू (मिसाईल) पडली होती. ते पृष्ठभागावरून प्रक्षेपित करण्यात आलं. याची माहिती मिळताच पाकिस्तानी हवाई दलानं शोध मोहीम सुरू केली. ‘तो मोठा अनर्थ होऊ शकतो’ पुढे ते म्हणाले की, मिसाईलच्या उड्डाणामुळे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याचं कारण काय, हे भारताने सांगावं. त्यामुळे मोठी विमान दुर्घटना घडू शकते. एका प्रश्नाच्या उत्तरात पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ते मिसाईल टाकलं गेली नाही, तर ते स्वतः पडलं. हे क्षेपणास्त्र 40,000 फूट उंचीवरून जात होतं.