नवी दिल्ली 07 जानेवारी : सध्या जगभरात कोरोनानं (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नवीन व्हेरिएंटनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. युरोपमध्ये तर कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यानच आता आणखी एक नवीन संकट येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रसार होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (WHO) सुद्धा बर्ड फ्लू वाढण्याचाी आणि पसरण्याची शक्यता वर्तवली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, आशिया आणि युरोपमध्ये बर्ड फ्लूचे एकापेक्षा जास्त व्हेरिएंट आढळू शकतात. इंग्लंडमधील हेल्थ सिक्युरिटी एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) इंग्लंडमध्ये (England) राहणाऱ्या एका व्यक्तीला दुर्मिळ पक्षी संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. हा बर्ड फ्ल्यूचा व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे. युकेएचएसएच्या (UK Health Security Agency) अहवालानुसार संसर्ग झालेली व्यक्ती बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यालाही संसर्ग झाला. बर्ड फ्लू झालेले पक्षी त्या व्यक्तीच्या घराजवळ होते. ओमिक्रॉन वेगाने पसरत असतानाही तज्ञांना काळजी नाही! जाणून घ्या काय आहे कारण या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात आला आहे. सर्वांची टेस्ट (Test) करण्यात आली असता सर्वांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह (Negative) आले आहेत. बर्ड फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीला आयसोलेशनमध्ये (Isolation) ठेवलं असून त्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली आहे, असं हेल्थ सिक्युरिटी एजन्सीनं सांगितलं आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग एव्हियन एन्फ्लुएंझा व्हायरसमुळं (H5N1) होतो. बर्ड फ्लू मनुष्यात पसरत नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, खबरदारी म्हणून लोकांनी मृत पक्ष्यांना हात लावू नये. बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांना नष्ट करण्यात आलं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एव्हियन फ्लू (Avian flu) विषाणूचा सामान्य लोकांना खूप कमी धोका असतो. परंतु, हा विषाणू मानवांमध्ये पसरल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या मजबूत यंत्रणेच्या मदतीनं हा संसर्ग शोधण्याचं आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती यूकेएचएसएच्या मुख्य शास्त्रज्ञ व अधिकारी प्रोफेसर इसाबेल ऑलिव्हर (Isabel Oliver) यांनी दिली.
यूकेतील व्यक्तीमध्ये आढळलेला विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये प्रसारित (Transmission) होऊ शकतो, याचा सध्या कोणताही पुरावा मिळालेला नाही. परंतु, व्हायरस कुठलाही असो तो वेळेनुसार नेहमीच विकसित होत जातो. त्यामुळे शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास करण्यास आणि परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. बर्ड फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेतला गेला आहे. ते सर्वजण सुरक्षित आहेत, असंही इसाबेल म्हणाल्या. यूकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer), क्रिस्टीन मिडलमिस यांनी देखील या प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एव्हियन एन्फ्लुएंझा (Avian influenza) पक्ष्यांमध्ये अधिक संसर्गजन्य आहे. मात्र, आता एका व्यक्तीला त्याची लागण झाली आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे, असं क्रिस्टीन म्हणाल्या. एकूणच एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आल्यानं यूकेसह जगभरातील आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली आहे. जर, एव्हियन एन्फ्लुएंझाचा मानवामध्ये प्रसार झाला तर सर्वांना कोरोना आणि फ्लू अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागू शकतो.