Japan Sakurajima Volcano: जपानमध्ये सकुराजिमा ज्वालामुखीचा काल रात्री 8:05 च्या सुमारास स्फोट झाला. या उद्रेकातून बाहेर पडलेले दगड तब्बल अडीच किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन पडल्याची माहिती जपानच्या हवामान संस्थेनं दिली आहे.
जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटावर रविवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक होऊन राख आणि दगड बाहेर पडत आहेत. सध्यातरी आजूबाजूच्या शहरांमध्ये कोणतंही नुकसान किंवा दुखापत झाल्याचं वृत्त नसलं तरी स्थानिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जपानच्या हवामान संस्थेनं सांगितलं आहे की, साकुराजिमा ज्वालामुखीचा स्फोट रात्री 8:05 च्या सुमारास झाला. या उद्रेकातून निघणारे दगड अडीच किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन पडले आहेत.
जपानच्या सरकारी NHK टीव्हीवर प्रसारित झालेल्या व्हिज्युअल्समध्ये ज्वालामुखीतून निघणाऱ्या ज्वाला आणि राखेचे प्लम्स उठताना दिसत होते. उपमुख्य कॅबिनेट सचिव योशिहिको इसोझाकी म्हणाले की, “आम्ही लोकांच्या जीवाला प्राधान्य देत आहोत आणि परिस्थितीचं आकलन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.” त्यांनी परिसरातील लोकांना अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून लोकांचे जीव वाचू शकतील.
एजन्सीनं सांगितलं की, त्यांनी या संदर्भात कमाल पातळीचा पाचवा इशारा जारी केला आहे आणि दोन्ही शहरांतील 120 रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे.
ज्वालामुखीतील दगड तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात पडू शकतात आणि लावा, राख आणि सीअरिंग गॅस दोन किलोमीटरच्या परिसरात पसरू शकतात, असा इशारा एजन्सीनं दिला आहे. (फाइल फोटो)