वुहान, ता.२८ एप्रिल: ऐतिहासिक भारत-चीन शिखर परिषदेची आज सांगता झाली. दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखण्याची तयारी दाखवली आहे. अफगाणिस्तानच्या फेर उभारणीच्या कामात भारत आणि चीन सहकार्यानं प्रकल्प राबवतील अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. या शिखर परिषदेला कुठलाही ठराविक अजेंडा नव्हता. त्याचबरोबर घोषणापत्र किंवा संयुक्त पत्रकार परिषदही घेण्याचही ठरलेलं नव्हतं त्यामुळं कुठलही घोषणापत्र किंवा प्रसिध्दी पत्रकही काढण्यात आलं नाही. फक्त महत्वाच्या मुद्यांची माहिती गोखले यांनी दिली. त्यातून अनेक महत्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या असून भारत आणि चीनमध्ये सहकार्याच्या नव्या पर्वाची ही सुरवात मानली जात आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शी जिनपींग यांच्यात चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या. दिवसाची सुरवातच दोन्ही नेत्यांनी ईस्ट लेकच्या निसर्गरम्य परिसरात फेरफटका मारून केली. नंतर पारंपरिक चहाचा अस्वाद घेऊन चर्चा केली. त्यानंतर एका खास बोटीत बसून दोन्ही नेत्यांनी ईस्ट लेकमध्ये विहार करत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. नवं पंचशील सर्व मतभेद आणि प्रश्न केवळ चर्चा आणि शांततेच्या मार्गानच सोडविले जावू शकतात यावर दोन्ही देशांचं एकमत आहे. आणि त्याच मार्गनं पुढे जाण्याचं ठरलं असल्याचंही गोखले यांनी सांगितलं. जागतिक लोकसंख्येचा मोठा भाग भारत आणि चीनमध्ये राहतो. शांतता, सहकार्य, सामंजस्य, विश्वास आणि समान दृष्टी हे एकविसाव्या शतकातलं पंचशील आहे आणि त्यावरच पुढची वाटचाल असली पाहिजे असं पंतप्रधान मोदींनी चर्चेच्या वेळी अध्यक्ष जिनपींग यांना सांगितलं. अफगाणिस्तानमध्ये सहकार्य आत्तापर्यंत अफगाणिस्तानच्या पुर्नउभारणीत भारत नेहमीच अमेरिकेच्या मदतीनं काम करत होता. आता संतुलन साधन भारत आणि चीनही सहकार्यानं अनेक प्रकल्प हाती घेणार आहे. हा निर्णय म्हणजे पाकिस्तानला धक्का मानला जातो. कारण अफगाणिस्तानात चीन नेहमीच पाकिस्तानचं सहकार्य घेत आला आहे. सीमा प्रश्न सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीन एका विशेष प्रतिनिधींची नियुक्ती करणार असून ते हा प्रश्न सोडवण्याचा रोड मॅप तयार करणार आहेत. दहशतवाद दहशतवादाविरूध्द जागतिक पातळीवर सहकार्य करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. चांगला आणि वाईट दहशतवाद असू शकत नाही हे मोदींनी जिनपींग यांना पुन्हा एका सांगितलं. पाकिस्तानला धास्ती अमेरिकेशी दुरावा झाल्यानंतर पाकिस्तानने चीनला आपल्या जवळ खेचलं होतं. पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडॉर आणि काही बंदरही पाकिस्तानने चीनला विकासासाठी दिले होते. मात्र पाकिस्तानच्या मैत्रीला मर्यादा आहेत हे चीनला माहित आहे. त्यामुळं चीनने भारताशी मैत्रीचा हात पुढे केल्यावर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. शेवटी चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाने खुलासा करत चीन-पाकिस्तान मैत्री कायम असून भारता-चीनची मैत्री आणि पाकिस्तानसोबतचे संबंध हे स्वतंत्र आहेत असं स्पष्ट करत पाकिस्तानची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला.