Ian Wileman
नवी दिल्ली, 13 डिसेंबर: माणूस आणि प्राण्यांचं नातं अगदी अनोखं असतं. प्राणी कोणतंही कपट मनात न ठेवता निस्वार्थीपणे माणसावर प्रेम करतात. त्या तुलनेत माणसाचं प्रेम मात्र कुठेतरी कमी पडतं. पण आज आम्ही तुम्हाला इंग्लंडमधील एका अशा व्यक्तीची भेट घडवणार आहोत ज्याचं अशा प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. विश्वास बसणार नाही. इंग्लंडमधील इयान विलिमॅन (Ian Wileman) हा खराखुरा स्पायडरमॅन आहे. कारण इयान एक ,दोन नाही तब्बल एक हजार कोळ्यांसोबत (England Man Lives with 1000 Spiders) राहतो. इयाननं त्याच्या घरात एक हजार कोळी म्हणजेच स्पायडर पाळले आहेत. अर्थात यामागे खास कारण आहे. इयान 53 वर्षांचा आहे आणि तो लिव्हरपूल इथं राहतो. त्याची 37 वर्षांची पत्नी मिशेल (Michelle)हिचं 2016 मध्ये गंभीर आजारानं निधन झालं.तिला इन्फ्लुएंझा व्हायरस आणि स्कार्लेट फिवर यामुळे सेपसिस हा आजार झाला होता. त्यामुळे ती अक्षरश: मृत्युशी झुंज देत होती. त्याचवेळेस मिशेलचा लाईफ सपोर्ट बंद करण्याचा निर्णय इयानला घ्यावा लागला. हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यांत दु:खद निर्णय होता. त्यानंतर इयान पूर्णपणे कोलमडून गेला होता. पत्नीच्या मृत्युनंतर इयान आणि त्याचा आठ वर्षांचा मुलगा बिली अगदी एकटे पडले होते. त्याचवेळेस इयानला त्याच्या कोळ्यांची म्हणजेच स्पायडरची आठवण आली. खरंतर अगदी लहानपणापासूनच इयानला स्पायडर पाळण्याचा छंद होता. घरात अनेक डब्यांमध्ये त्यानं हे कोळी पाळले होते. त्याची पत्नी मिशेल ही शिक्षिका होती. ती टिचिंग कोर्स करत असताना तिची इयानबरोबर ओळख झाली. तेव्हा त्यानं मिशेलला आपल्या या कोळी पाळण्याच्या छंदाबद्दल सांगितलं. मिशेल त्यामुळे एकदम प्रभावित झाली होती. याच कोळ्यांनी मिशेलच्या मृत्युच्या दु:खातून बाहेर काढायला इयान आणि त्याच्या मुलाला मदत केली असं इयानचं म्हणणं आहे. मिरर वेबसाईटवर इयानबद्दल एक रिपोर्टही प्रसिध्द झाला आहे. इयानचा मुलगा बिली यालाही स्पायडर पाळण्याचा छंद आहे, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या एक हजार कोळ्यांपैकी 80 कोळी त्यानं आपल्या पॉकेटमनीमधून विकत घेतले आहेत. पत्नीच्या मृत्युनंतर इयान खूप दु:खात होता. या कोळ्यांची देखभालही तो नीट करू शकत नव्हता. त्यानं एकदा सहज कोळ्यांच्या खोलीत डोकावून पाहिलं तर दोन कोळी मेले होते. आपण या कोळ्यांना पाणीच दिलं नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याला खूप वाईट वाटलं. त्यानंतर त्यांनी या कोळ्यांच्या देखभालीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. या हजार कोळ्यांची आपल्यावर जबाबदारी आहे. त्यांच्याकडे जातीनं लक्ष द्यावं लागतं, असं इयानचं म्हणणं आहे. या कोळ्यांची काळजी घेताना आपली पत्नी मिशेलच आपल्याबरोबर आहे असं इयानला वाटतं. आता हे कोळीच त्याचं आयुष्याचं ध्येय आहेत. त्यामुळे इयानला ‘स्पायडर मॅन’ म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.