युक्रेन, 24 फेब्रुवारी: एएफपीच्या वृत्तानुसार, आता रशियन सैन्यानं (Russian forces) म्हटलं की, त्यांनी युक्रेनच्या (Ukraine) लष्करी आणि हवाई तळांना लक्ष्य करून ते नष्ट केले आहेत. दुसरीकडे युक्रेननं हार मानणार नसल्याचं म्हटलं आहे. लुहान्स्क भागात रशियाची पाच विमाने (Russian planes) आणि एक रशियन हेलिकॉप्टर (Russian helicopter) पाडण्यात आल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाने क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. युक्रेनमधील ओडेसा येथील ब्लॅक सी बंदरात स्फोट झाल्याची माहिती एएफपीनं दिली आहे. गुरुवारी सकाळपासून युक्रेनच्या विविध भागातून स्फोटाचं वृत्त येत आहे. याआधी युक्रेनच्या पूर्वेकडील भाग आणि कीवमधून स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. युक्रेनकडून युद्ध थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राजधानी कीवचे विमानतळ रिकामे करण्यात आलं आहे. रशियाकडून एअरपोर्ट बंद AFP नं दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश देत, रशियाचा त्यावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलंय. पण जर बाहेरून धोका असेल तर त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिलं जाईल. यासोबतच रशियानं युक्रेनच्या सीमेजवळ सुमारे 2 लाख सैनिक तैनात केले आहेत. इकडे युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे अनेक आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेस्सा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहे. युक्रेनकडून देशव्यापी आणीबाणी घोषित पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली आणि मॉस्कोनं युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. युक्रेनच्या खासदारांनी राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या देशव्यापी आणीबाणी लागू करण्याच्या आदेशाला मान्यता दिली आहे जी गुरुवारपासून 30 दिवस चालेल.