नवी दिल्ली, 04 एप्रिल : चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. युरोपीय देशांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जगभरात आतापर्यंत 10, 81,952 लोकांना कोविड-19ची लागण झाली आहे. एकट्या युरोपमध्ये आतापर्यंत हजारहून अधिक लोकांचा या व्हायरमुळे मृत्यू झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात याचा आकडा आणि प्रभाव कमी असलता तरी दिवसागणिक वाढणाऱ्या केसेस चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. दरदिवशी जवळपास 200 नव्या लोकांना कोरोनाची लागण होत असल्याचं भारतात समोर येत आहे. भारतात मागच्या 24 तासांमध्ये कोरोनाची 478 लोकांना लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 2547 वर पोहोचला आहे. 62 जणांचा यामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात 490, केरळ, तेलंगणा, कर्नाटकात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. युरोपमध्ये 40 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू युरोपमध्ये कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. आतापर्यंत 40 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त इटलीमधील लोकांचा समावेश आहे. त्यानंतर स्पेन आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो. एएफपी न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार 40, 768 लोकांचा मृत्यू कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे झाला आहे. तर आतापर्यंत 5, 74,525 लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. यामध्ये इटली आणि स्पेनला सर्वात जास्त कोरोनाचा विळखा बसला आहे. इटलीत 14, 681 तर स्पेनमध्ये 10,935 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर फ्रान्समध्ये 5 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.