वॉशिंग्टन, 07 ऑगस्ट : भारतानंतर आता अमेरिकेनं चीनला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत tik tok आणि wechat या चीनी अॅपवर बंदी घातली आहे. अमेरिकेतील या अॅपसोबत होणारे आर्थिक व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतानंतर आता अमेरिकेनंही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. या अॅपमुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तातडीनं दोन्ही अॅपसोबत असणारे अमेरिकेचे व्यवहार थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. tik tok चालवणारी बाईटडान्स कंपनी 45 दिवस अमेरिकेसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करणार नाही अशी माहिती मिळाली आहे.
tik tok युझरची माहिती हे अॅप परस्पर चीनला पुरवत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मागच्या महिन्यात भारताने टिकटॉकसह जवळपास 130 हून अधिक चीनी अॅपवर बंदी घातली आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनाचा जगभरात उद्रेक झाल्यानंतरही चीन त्यांची चूक मान्य करायला तयार नाही याशिवाय चीनच्या सातत्यानं सुरु असलेल्या कुरापतींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि अमेरिकेनं चीनी वस्तू आणि अॅपवर बंदी घातली आहे.