JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Kazakhstan Unrest : कझाकस्तानमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; 26 ठार, हजारो जणांना अटक

Kazakhstan Unrest : कझाकस्तानमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; 26 ठार, हजारो जणांना अटक

कझाकस्तानमध्ये एक जानेवारीपासून सरकारनं एलपीजी इंधनाचे (LPG) दर दुप्पट केले. त्याविरुद्ध नागरिकांनी आंदोलन सुरू केलं. सरकारनं दरवाढ मागे न घेतल्यानं नागरिकांमधला असंतोष वाढला आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नूरसुल्तान (कझाकस्तान) : कझाकस्तानमध्ये (Kazakhstan) इंधन दरवाढीविरुद्ध (Hike in LPG Price) सुरू असलेल्या आंदोलनाला (Unrest) हिंसक वळण लागल्यानं आणि संपूर्ण देशात दंगली, हिंसाचार सुरू झाल्यानं राष्ट्राध्यक्ष कासेम झोमार्ट टोकायेव यांनी रशियाकडे (Russia) मदत मागितली. रशियन सैन्याच्या तुकड्या तिथे दाखल झाल्यानंतर काही तासांतच कझाकस्तानच्या सैन्यानं 26 सशस्त्र आंदोलकांना ठार केल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष टोकायेव यांनी केला आहे. सर्व प्रांतात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाल्याचं त्यांनी जाहीर केल्याचं वृत्त ‘एएफपी’ वृत्तसंस्थेनं दिलं आहे. देशात हिंसाचार, दंगली घडवणाऱ्या दंगलखोरांना काबूत ठेवण्यासाठी सुरक्षा दलं तैनात राहतील, असंही राष्ट्राध्यक्ष टोकायेव यांनी स्पष्ट केलं. राजधानी नूर अल सुल्तानसह अनेक प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्यानं यात दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप कासेम झोमार्ट टोकायेव यांनी केला होता. अलमाटीमध्ये 26 सशस्त्र दंगलखोरांना लष्करानं ठार केलं असून, 18 जण जखमी झाले आहेत. सर्व भाग आंदोलकांपासून मुक्त करण्यात आले असून, सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. 2300 पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर 70 ठाणी उभारण्यात आली आहेत, असा दावा कझाकस्तानच्या गृहमंत्रालयानं केला आहे. कलेक्टीव्ह ट्रीटी ऑर्गनायझेशनकडे (CSTO) करण्यात आलेल्या विनंतीनुसार सीमेपलीकडून पाठवण्यात येणाऱ्या प्रशिक्षित आंदोलकांचा मुकाबला करण्यासाठी कझाकस्तान सैन्याच्या मदतीसाठी रशियन सैन्य सज्ज आहे, असं एएफपी वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. हेही वाचा :  कंगना रणौतचं रेस्टॉरंटमध्ये किळसवाणं कृत्य; Video Viral, चाहत्यांनी केलं ट्रोल कझाकस्तानमध्ये एक जानेवारीपासून सरकारनं एलपीजी इंधनाचे (LPG) दर दुप्पट केले. त्याविरुद्ध नागरिकांनी आंदोलन सुरू केलं. सरकारनं दरवाढ मागे न घेतल्यानं नागरिकांमधला असंतोष वाढला आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कझाकस्तानाची आर्थिक राजधानी आणि सर्वांत मोठं शहर असलेल्या अलमाटीमध्ये मंगळवारी रस्त्यावर उतरलेल्या हजारो संतप्त आंदोलकांनी जाळपोळ, हिंसाचार सुरू केला. बुधवारी आंदोलकांनी सरकारी इमारतींना लक्ष्य केलं आणि अनेक सरकारी इमारतींची तोडफोड केली. तसंच राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान, महापौर कार्यालय पेटवून दिलं. तीन दशकं या देशावर राज्य करणारे नूर सुलतान नझरबायेव यांनी निवडलेले राष्ट्राध्यक्ष कासेम झोमार्ट टोकायेव यांना हटवण्याची मागणी करून आंदोलकांनी नझरबायेव यांचा पुतळा पाडण्याचाही प्रयत्न केला. नूर सुलतान नझरबायेव आणि त्यांचे वारसदार राष्ट्राध्यक्ष कासेम झोमार्ट टोकायेव हे दोघेही भ्रष्टाचारी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. गुरुवारी रात्री पोलीस आणि आंदोलक यांच्यात झालेल्या चकमकीत आंदोलकांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांचा शिरच्छेद केल्याचा, तर 18 जवानांना ठार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 12 आंदोलक ठार झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. या चकमकीत 748 सैनिक जखमी झाले आहेत. हेही वाचा :  1 हजारात लसीकरणाचे प्रमाणापत्र, मुंबईतील धारावीतून एकाला अटक कझाकस्तानचे माजी ऊर्जामंत्री आणि डेमोक्रॅटिक चॉइस ऑफ कझाकस्तान या पक्षाचे प्रमुख मुख्तार अब्लायाजोव्ह यांनी हे आंदोलन म्हणजे कासेम झोमार्ट टोकायेव यांची सद्दी संपल्याचे संकेत असल्याचं वक्तव्य केलं आहे. या पक्षानं आंदोलकांना उघड पाठिंबा दिला आहे. नागरिकांनी रशियाच्या फौजा आपल्या देशात आणण्याला विरोध करण्याची गरज असल्याचंही अब्लायाजोव्ह यांनी म्हटलं आहे. यामुळे व्लादिमीर पुतीन यांच्या पुन्हा अखंड सोव्हिएट रिपब्लिक निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेला पाठबळ मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुतीन यांचा कझाकस्तानमधला वाढता हस्तक्षेप युक्रेनसारखे आणखी एक शत्रू राष्ट्र निर्माण करणारा ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघ (UN) आणि युरोपीय महासंघाने कझाकस्तान सरकार आणि आंदोलक या दोघांनाही शांतता प्रस्थापित करण्याचं आणि नागरी हक्कांचं संरक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेनेही (USA) कझाकस्तान सरकारला आंदोलन शमवण्यावर भर देण्याचा आणि वादाचा मुद्दा दूर करण्याचा सल्ला दिला असून, अलमाटीमध्ये रशिया करत असलेल्या कारवाया सगळं जग बघत असल्याचा इशारा रशियाला दिला आहे. या आंदोलनामुळे कझाकस्तानमधलं जनजीवन विस्कळीत झालं असून, सर्वसामान्य नागरिकांचं जगणं अवघड झालं आहे. हे आंदोलन कधी संपुष्टात येतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या