सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड अनेक वर्षांपासून ऐकू येते. त्यामुळे पटसंख्येअभावी या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवतात. परंतु अनेक मराठी शाळांमध्येही यशस्वी विद्यार्थी घडतात. आजही अशा अनेक प्रसिद्ध मराठी शाळा अस्तित्त्वात आहेत. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात असलेल्या पापरी गावच्या जिल्हा परिषद शाळेचं सर्व स्तरावर कौतुक होतंय. कारण इंग्रजी खासगी शाळांच्या गर्दीत या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या लांबच लांब रांगा लागतात. या शाळेत केवळ पापरीतील विद्यार्थीच नाही, तर इतर 5 ते 6 गावांमधील विद्यार्थीदेखील शिकतात. आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने या शाळेने जिल्ह्यातील सर्व शाळांपुढे आदर्श निर्माण केला आहे.