महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत अगदी शंभर टक्क्यांपर्यंत गुण घेतले आहेत. राज्यातील बहुतांश शाळांचा निकाल 100 टक्के एवढा लागला आहे. जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आहेच. मात्र काही विद्यार्थी अगदी काठावर पास होऊनही आनंदी असतात. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील साईप्रसाद रविंद्र खेडकर याला सर्वच विषयांत 35 गुण मिळाले आहेत. त्यामुळे 35 टक्के गुण मिळूनही त्याच्या कुटुंबीयांनी मुलगा पास झाल्याच्या आनंदात मोठा जल्लोष केलाय.