सध्याच्या काळात शहरांमध्ये हवा प्रदुषण ही गंभीर समस्या बनत आहे. कोल्हापुरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत मिळालेल्या निधीमधून शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या दाभोळकर कॉर्नर येथे धूलिकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एअर प्युरिफायर मशीन बसविण्यात आली आहे. आता असेच मिस्ट टाईप फाउंटन इतरही प्रमुख चौकांत बसवण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील हवा प्रदूषणात घट होण्यास मदत होईल, असे मत कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी व्यक्त केले.