होळी या सणाला भारतभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरांचं पालन केले जातं. त्यातील अशीच एक परंपरा विदर्भात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे शेणापासून तयार होत असलेले गोळे किंवा चकऱ्या. गाईच्या शेणापासुन तयार होणाऱ्या या चकऱ्यांना ‘चाकोल्या’ सुद्धा म्हटलं जाते. आधी शेणाच्या चाकोल्यांची ही माळ होळीमध्ये अर्पण करून होळी पेटवली जायची. पूर्वीच्या काळात होळीची लगबग सुरू होताच घरोघरी विशेषतः वृद्ध आणि चिमुकले चाकोल्या बनवण्यात व्यस्त दिसायचे. मात्र आता आधुनिक काळात ही परंपरा कुठेतरी लुप्त झालेली दिसून येते. त्यामुळे आपली होळीची परंपरा कायम राहावी आणि गो सेवेला हातभार लागावा यासाठी वर्ध्यातील पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रम येथे गाईच्या शेणापासून चाकोल्या बनविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या चाकोल्या विक्री केल्या जात आहेत आणि विक्रीतून मिळालेले पैसे हे गो सेवेसाठी उपयोगात आणले जाणार आहेत