आपल्या जीवनात रक्ताला अत्यंत महत्व आहे. एखाद्या अपघातात किंवा संकट काळात प्राण वाचवण्यासाठी कोणत्याही प्राणी, पक्षी, मनुष्य यांना रक्तचीच गरज असते. म्हणूनच रक्तदानालाच जीवनदान म्हणूनही ओळखले जाते. अशात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी त्याचबरोबर सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनाच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. सध्या बरेच जण रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची गरज ओळखून रक्तदान करत असतात. अशातच कोल्हापुरातील एका रक्तदात्याने तब्बल 178 वेळा रक्तदान केले आहे. तर त्यांच्या मुलानेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आजवर 40 हून अधिक वेळा रक्तदान केले आहे. जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने याच कोल्हापुरच्या रक्तदात्याबद्दल जाणून घेऊयात.