आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.अकरा पत्रा शेड भाविकांनी फुल्ल झाले होते. सावळ्या विठुरायाच्या दर्शना नंतर भाविक आनंदी झाले. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.यावेळी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.