शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन गट झाले आहेत. हे दोन्ही गट आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. परंतु, निवडणूक आयोगाने मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. तसेच पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्हदेखील शिंदेंच्या गटाला दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी काही वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सुनावणीत या खंडपीठाने निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयासंदर्भात नियम पाळले जाण्याची टिप्पणी केली होती.