शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजनान कीर्तिकर आणि नेते रामदास कदम यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. गजानन कीर्तिकरांनी शनिवारी प्रेसनोट प्रसिद्ध करून त्यात रामदास कदमांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून केला होता. याला रामदास कदमांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. गजानन कीर्तिकर भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, अशी टीका रामदास कदमांनी केली आहे. रामदास कदम म्हणाले, “दिवाळीत शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये फटाके फुटत आहेत. हे पक्षासाठी भूषावह नाही. कीर्तिकरांचं वय ८० ते ८५ वर्षे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी कीर्तिकरांनी चर्चा करायला हवी होती. पण, वय झाल्याने कीर्तिकर भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे. कारण, कुठलाच वरिष्ठ नेता प्रेसनोट काढत नसतो.”