मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मागच्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या प्रश्नावरून दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, पण या पत्रकार परिषदेच्या आधीचा या तिघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.‘परवा रात्री उशीरा सह्याद्रीवर बैठक घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी साधकबाधक चर्चा बैठकीत झाली. सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माध्यमांसोबत चर्चा करायला आलो. चर्चा करायला येत असताना आम्ही बोलत येत होतो, बैठकीत ज्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली त्या मुद्द्यावरच बोलूया, आज कोणतेही राजकीय प्रश्न नको, अशी आमच्यात चर्चा सुरू होती’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.