ऑलिंपिक क्रीडा स्पर्धां सर्वसमावेशक असते. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अशा या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुंबईत होणारे अधिवेशन भारतासाठी ऑलिंम्पिक संयोजनाची संधी घेऊन येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा या अधिवेशनाचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. या अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे कार्यकारी मंडळ मुंबईत दाखल झाले. या कार्यकारी मंडळाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे स्वागत केले. या दोघांनीही हे अधिवेशन संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच यातून ऑलिंपिकशी निगडीत विविध स्पर्धांच्या संयोजनाची संधी भारताला मिळेल ,अशी आशाही व्यक्त केली.