सातारा, 23 डिसेंबर : साताऱ्यामध्ये रविवारी पुणे-कागल महामार्गावरील खंबाटकी घाटातील तीन मार्गिका बोगद्याच्या कोनशिलेचं अनावरण गडकरी आणि फडणवीस यांच्याहस्ते अनावरण झालं. यावेळी साताऱ्याचे राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं. ''गडकरींनी केवळ माझ्याच नव्हे, तर अनेक मतदारससंघात कामे केली आहेत. आणि जनता त्यांनी केलेल्या कामाची नक्कीच पोचपावती देईल. ते नुसतं बोलत नाहीत, तर करून दाखवतात'', असं उदयनराजेंनी यावेळी म्हटलं. त्यांच्या या कौतुक वर्षावामुळे राजेंची भाजपशी जवळीक वाढली की काय? या चिंतेने राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले आणि भाजपमधील वाढती जवळी राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी आहे.