सिंधुदुर्ग, 17 जानेवारी : शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींची दररोज छेड काढणाऱ्या मध्य प्रदेशातल्या कामगार रोमिओंची संतप्त विद्यार्थिनींनी आणि पालकांनी जाम धुलाई केली. हा प्रकार सिंधुदुर्गातल्या कुडाळ हायवेवर घडला. या संतप्त मुलींनी चप्पल आणि काठीने या कामगार रोमिओंना चांगलंच बदडून काढलं. मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या 'दिलीप बिल्डकॉन' या मध्यप्रदेशातल्या कंपनीचे हे कामगार आहेत. याबाबत कळवूनही कुडाळ पोलीस घटनास्थळी वेळेवर न पोहोचल्याने, जमलेल्या संतप्त जमावाने काही काळ मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक रोखून धरली होती. नंतर पोलीसांनी या कामगारांना ताब्यात घेत कुडाळ पोलीस स्टेशन गाठलं. गेल्या चार-पाच दिवसांपासून हे कामगार या विद्यार्थिनिंची शाळेत येता-जाता छेड काढत होते.