पिंपरी-चिंचवड, 4 ऑगस्ट : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागा कडून शहरातील डुक्करांचा बंदोबस्त केला जात नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक शिवाजी भोसले यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना चक्क जिवंत डुक्कर भेट म्हणून दिलं. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधील थेरगाव, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, वाकड रोड या परिसरात डुकरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. गेल्या 2 वर्षांत नागरिकांनी अनेकदा निवेदनं आणि तक्रारी दिल्या. मात्र, महापालिकेनं त्याची अजिबात दखल घेतली नाही. पालिका अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शिवाजी भोसले यांनी चक्क जिवंत डुक्कर त्यांना भेट म्हणून दिलं आणि प्रशासनाप्रती निषेध व्यक्त केला. या आंदोलना मुळे महापालिकेच्या मुख्य कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता.