मी यापूर्वी स्पितीची राईड केली होती. पण, इतर रायडर्ससोबत. यावेळी 8 बायकर्सच्या टीमची रोड कॅप्टन म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. मी यापूर्वी कधीही इतकी मोठी राईड लीड केली नव्हती. त्यात 7 असे रायडर्स होते ज्यांची एवढ्या मोठ्या राईडची पहिलीच वेळ होती. म्हणजे माझी एक चूक 8 जणांचा जीव धोक्यात घालू शकत होती. अशा परिस्थितीत आम्ही समुद्रसपाटीपासून 13054 फूट उंचावर बाईक चालवत होतो. हाडं गोठवणारी थंडी आणि ऑक्सिजनची कमतरतेमुळे मला mountain sickness चा त्रास होऊन नाकातून रक्त यायला लागलं. ही गोष्ट सहकाऱ्यांना सांगितली तर त्यांचे मनोबल खचणार होतं. शेवटी मला निर्णय घ्यावा लागला… प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. मी अंकिता कारेकर (डिंपी), पेशाने एक ग्राफिक डिझाईनर पण मला खरी ओळख मिळाली ती बाईक रायडिंग या माझ्या आवडीमुळे. मी मूळची बोरिवलीची, आई-बाबा, मोठी बहीण आणि मी अशी आमची small and happy family. मोबाईल नसलेल्या काळातील बऱ्याच मुलांना जशी होती तशी लहानपणापासून मलाही मैदानी खेळात रस होता. बऱ्याच मोठ्या असलेल्या आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये खूप लहान मुलं दिवसभर वेगवेगळे खेळ खेळत असायचे आणि मी पण त्यातलीच एक. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटनपासून अगदी लंगडी, खो खो पर्यंत सगळे खेळ दिवसभर चालू असायचे. त्यामुळे पडणं, लागणं या गोष्टींची पण लहानपणापासूनच सवय होती.
आणि हेच सगळं चालू असताना मला सायकलिंगची आवड लागली. सायकल कोणाची शिकली, कोणी शिकवली हे कळलं पण नाही. पण, वयाने मोठ्या असलेल्या मुलांमध्ये मी त्यांच्याईतकीच चांगली सायकल चालवायला लागली. दिवसभर सायकल वरून भटकणं, नॅशनल पार्क बाजूलाच असल्यामुळे तिथे जाऊन सायकल चालवणं वैगरे चालू असतानाच मला खरी उत्सुकता वाटू लागली ती बाईक चालवण्याची. त्याचं मुख्य कारण म्हणजे माझी आई. 1995 च्या काळात वैगरे एखाद्या स्त्री ने बाईक चालवणं हे आता इतकं कॉमन नव्हतं. पण, त्या वेळी माझी आई मला शाळेत तिच्या बजाज चेतक वरून सोडायला यायची आणि तेव्हाच मला बाईक विषयी आकर्षण वाटायला लागलं.
मग हळूहळू जशी मोठी झाली तशी ॲक्टिवा शिकली, सायकल चांगली चालवता येत असल्यामुळे ॲक्टिवा शिकायला इतका वेळ लागला नाही. आणि तशीच पण एक दोन वेळा धडपडून माझ्या वडिलांकडून आमची हिरो होंडा स्प्लेंडर बाईक पण शिकली. मग ज्या रस्त्यांवरून आधी सायकलने फिरत होते तिथून आता बाईकने फिरणं चालू झालं. हे सगळे पराक्रम आधी घरी माहीत नव्हते पण “अहो तुमची मुलगी बाईक चालवते” अशी खबर घरापर्यंत लवकरच पोहोचली. आणि एका अर्थी बराचं झालं, मला माझी स्वतःची ॲक्टीवा मिळाली.
मग काय सायकलच्या जागी स्कूटर आली आणि फिरण्याच्या सीमा हळूहळू वाढू लागल्या. आणि मग रायडिंगची आवड अजून जास्त वाढू लागली, नवीन नवीन जागा explore करण्यात मजा येऊ लागली. लोकांनी केलेल्या लेह लडाख राईडच्या गोष्टी बघून पूर्ण भारत फिरण्याची स्वप्नं दिसू लागली. आता लाँग राईड करण्यासाठी बाईक हवी आणि ती पण बुलेट हवी अशी माझी इच्छा होती. पण, त्या साठी घरून परवानगी मिळत नव्हती. कारण, बुलेट म्हणजे खूप वजनदार आणि सांभाळायला कठीण बाईक, ती धष्टपुष्ट मुलचं चालवतात असा घरच्यांचा समज होता, मग खूप हो नाही करता करता मला माझी पहिली बाईक बुलेटसाठी नाही पण बजाज एव्हेंजरसाठी परवानगी मिळाली.
एव्हेंजर घेतल्या नंतर मी माझी पहिली मोठी राईड (तशी छोटीच पण त्या वेळी ती ही मोठी वाटली होती) मुंबई - पुणे - मुंबई केली. माझ्या बरोबर माझे जे मित्र राईड करत होते त्यांच्याकडे बुलेट होती जी मी जवळपास 100 किलोमीटर चालवली आणि मला बुलेट चालवायचा आत्मविश्वास आला. मग दोनच वर्षात मी माझी रॉयल एन्फ्लीड हिमालयन घेतली. सर्वांना प्रश्न होताच की एवढी उंच आणि जड बाईक मी कशी संभाळेन. पण, मला आत्मविशवास होता की मी करू शकते.
महाराष्ट्राबाहेर प्रवास सुरू तोपर्यंत बऱ्यापैकी महाराष्ट्र भटकून झाला होता. आता मला इतर राज्य खुणावू लागली होती. खूप प्लॅन्स बनले आणि या ना त्या कारणाने कॅन्सल झाले, मला हवी तशी कोणाची साथही मिळत नव्हती. मग मी ठरवलं की आता सोलो राईड करायची आणि एके दिवशी सकाळी गोव्यात जायला निघाली. एका दिवसात 600 किलोमीटर ते ही एकटीने आणि एकही मोठ्या राईडचा अनुभव नसताना या गोष्टीचं थोडं दडपण होतं. पण, माझ्या पहिल्या सोलो राईडच्या उत्साहापुढे ते जाणवलं नाही. मी जवळपास 12-13 तासात गोवा गाठलं आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने एक रायडर म्हणून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.
स्वप्नातील राईड.. माझं स्वप्न नेहमीच काश्मीर ते कन्याकुमारी ( K2K) ही राईड करण्याचं होतं. पण वेळेचं गणित बसत नसल्या कारणाने मी ही राईड 2 भागांमध्ये केली. आणि त्याचा पहिला भाग मी मुंबई - स्पिती - लेह - मुंबई असा पूर्ण केला. एकूण 24 दिवसांच्या या राईड मध्ये मी एकूण 8 राज्यांमधून जवळपास 7000 किलोमीटर बाईक चालवली. मला माझ्या मित्रांनी बऱ्याच लोकांसारखी बाईक ट्रेन मधून दिल्लीपर्यंत नेण्याचा सल्ला दिला होता. पण, माझा हट्ट होता की मला पूर्ण राईड बाईकवरूनच करायची आहे आणि मी ती तशीच केली.
24 दिवसात तीनही ऋतूंचा कहर अनुभवला 24 दिवसांच्या या राईड मधला प्रत्येक दिवस मला खूप साऱ्या आठवणी आणि अनुभव देऊन गेला. 24 दिवसात तीनही ऋतूंचे कहर अनुभवायला मिळाले. मुंबई मधून निघताना जबरदस्त पाऊस, राजस्थान मधील कडक ऊन आणि हिमाचल मधील कडाक्याची थंडी. - 10 ते 45 या मधील सर्व तापमानातून हा प्रवास झाला. राजस्थान ते चंदिगढ हा प्रवास चालू असताना “वायू” वादळाचा लागलेला झटका, लेहला असताना अचानक झालेली ढगफुटी, नुबराला असताना झालेला सँड वादळ हे प्रसंग आयुष्यात न विसरण्यासारखे होते. या राईडमध्ये बाईक रायडिंग विषयी पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, साध्या रस्त्यावर आणि डोंगराळ भागात बाईक चालवण्या मधला फरक कळला. डोंगराळ भागात बाईक चालवताना काय काळजी घ्यावी लागते आणि ती न घेतल्यास त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा अंदाज आला. एकूणच या राईडने मला एक अजून चांगल रायडर बनवलं.
मग मी माझ्या K2K राईड चा दुसरा भाग मुंबई - कन्याकुमारी - मुंबई असा पूर्ण केला. 16 दिवसांचा हा प्रवास 5 राज्यांमधून जवळपास 5200 किलोमीटर इतका झाला. आणि अश्या प्रकारे माझी काश्मीर ते कन्याकुमारी ही राईड पूर्ण झाली. K2K राईड नंतर माझा आत्मविश्वास उंचावलेला होता आणि मग मी उत्तराखंड राईड प्लॅन करू लागली. पण, त्याच वेळी माझे काही मित्र स्पितीची राईड प्लॅन करत होते आणि त्यांना राईड लीड करायला एका अनुभवी रायडरची गरज होती म्हणून त्यांनी मला या विषयी विचारले आणि मला स्पिती राईड करायची पुन्हा एकदा संधी मिळाली. या राईड मध्ये मी 26 दिवसात 5500 किलोमीटरचा प्रवास यशस्वीरीत्या पार पाडला.
नाकातून रक्त यायला लागलं या राईडमध्ये खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि बऱ्याच अश्या गोष्टी कळल्या, ज्या माझ्या मध्येच होत्या पण त्या बाहेर यायला कधी संधी मिळाली नव्हती. 8 बायकर्सच्या टीमची रोड कॅप्टन म्हणून जी जबाबदारी आली होती ती कितपत पार पाडू शकेन याबद्दल मनात धाकधूक होत होती. ती पार पडेल याचा विश्वास होता. पण, या आधी कधी एवढी मोठी राईड लीड केली नव्हती. त्यात 7 असे रायडर्स होते ज्यांची एवढ्या मोठ्या राईडची पहिलीच वेळ होती. 1300 किलोमीटरची राईड आणि त्यात जवळजवळ 150 किलोमीटर तर असे की आपला रस्ता आपल्यालाच बनवावा लागतो, चिखलाचे रस्ते, डोंगराळ वाटा, मोठे मोठे वॉटर क्रॉसिंग त्यात समुद्रसपाटीपासून 13054 उंचीवरचे पासेस (जिथे ऑक्सजनची कमतरता जाणवते आणि श्वास घ्यायला त्रास होतो) आणि हे सगळं कमी म्हणून कडाक्याची थंडी (0 च्या खाली) ज्यामुळे मला mountain sickness चा त्रास होऊन नाकातून रक्त यायला लागलं. पण, ही गोष्ट मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितली नाही. कारण, त्यामुळे कदाचित त्यांचं मनोबल ढासाळलं असतं. एक खोलवर श्वास घेतला अन् प्रवास चालूच ठेवला. अखेर या सर्व अडथळ्यांवर मात करून ही राईड आम्ही यशस्वीरीत्या पार पडली याचा अभिमान वाटतो.
माझाच विक्रम मोडला स्पिती राईड पूर्ण करून मी माझ्या उत्तराखंड राईडला निघाली. हृषिकेश, केदारनाथ नंतर बद्रीनाथ करून नैनीतालच्या रस्त्याने परत यायचा माझा प्लॅन होता. पण, केदारनाथ मधून निघताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे मला माझा मार्ग बदलवा लागला ज्यामुळे माझा बद्रीनाथ दर्शन होऊ शकलं नाही. आणि मग शेवटच्या टप्प्यात 1 दिवसामध्ये 713 किलोमीटरचा (उदयपूर - बोरिवली) प्रवास करून मी माझ्या आयुष्यातील 1 दिवसातील सर्वात जास्त प्रवास करायचा विक्रम केला.
कच्छच्या रणातील ती जीवघेणी रात्र मी आयुष्यात विसरणार नाही या राईडनंतर मला कच्छचे रण ही राईड करायची संधी मिळाली. आधी मझं असं मत होतं की डोंगरात बाईक चालवणे हे सर्वात कठीण असतं पण कच्छच्या राईडने माझं हे मत चुकीचं सिद्ध केलं. आम्ही कच्छ राईडमध्ये धोलाविरा ते होडको या मधील एक जास्त कोणाला माहीत नसलेला रस्ता explore करत होतो, तसं पाहिलं तर कच्छ हा वाळवंटी प्रदेश आहे, ज्यामुळे तिथे पाऊस फार कमीच पडतो. पण त्या दिवशी अवकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे त्या पूर्ण भागात चिखल झाला. आणि वाळू असल्यामुळे पूर्ण रस्ता चिकण माती असल्यासारखा इतका चिकट झाला की त्यावर 4 पावलं चालणं देखील अवघड वाटत होतं. अश्या रस्त्यावरून आम्हाला बाईक चालवायची होती. अपेक्षेप्रमाणे आमच्या बाईक खूप वेळा पडल्या आणि रात्र झाली तरीही आम्ही ठरवलेल्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही. ती रात्र आम्हाला रस्त्याशेजारी असल्येल्या एका झोपडीत काढावी लागली. कच्छच्या रणातील ती जीवघेणी रात्र मी आयुष्यात विसरणार नाही.
Yes!! woman can!! माझ्या या साऱ्या आतापर्यंत झालेल्या प्रवासातून आणि अनुभवातून मी एक गोष्ट शिकले की फक्त सप्न बघत बसू नका, ती पूर्ण करा. कोणाची तरी साथ नाही म्हणून एकट्याने प्रवास करायला घाबरु नका. हा आपला देश आहे आणि आपली माणसं आहेत आणि इथे आपण सुरक्षित आहोत. स्वतःवर बंधन घालून स्वप्नामागे धावणं सोडू नका. माझ्या मते तो दिवस दूर नाही जेव्हा रस्त्यावर रायडर मुलांची आणि मुलींची संख्या समान असेल. gender equality आणि women empowerment हे फक्त बोलायचे विषय नसून त्याची अंमबजावणीही झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायला हवी. Yes!! woman can!! - अंकिता कारेकर, बाईक रायडर, बोरिवली तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.