पुढच्याच क्षणी आम्ही जे पाहिलं त्यामुळे आम्ही इतकं घाबरलो की काय करावं काही सुचेना. तिथं इतकी शांतता होती, की माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू यायला लागली. रक्तदाबाचा प्रेशर हातातील नसांमध्येही जाणवत होता. असा प्रसंग येईल याची स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. काही क्षणांसाठी आता संपलं सगळं.. अशीच माझी अवस्था झाली होती. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. हाय फ्रेंड्स, मी सोनिया.. माझा जन्म कोलकात्याचा, तिथेच मी वाढले, शिक्षण घेतलं. पण, नंतर कामानिमित्त बँगलोरला आले आणि इथलीच झाली. मी सध्या यूएस कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करतेय. बाईक रायडींगकडे वळण्याची माझी स्टोरी वेगळीय. मला माझ्या लहानपणीच याचं बाळकडू वडिलांकडून मिळालं. जेव्हा मी 8 महिन्यांची होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला साहसी प्रवासाची ओळख करून दिली. 2016 पासून मी खऱ्या अर्थाने बाईक चालवायला सुरुवात केली. पण, त्याआधी मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी असं काही करेन म्हणून. पण, बाईकवरचा माझा सुरू झालेला प्रवास मात्र अव्याहतपणे सुरुच आहे. I have always believed in turning can’t into can and dream into plan. आणि हेच बाईकने माझ्यासाठी अधिक सोपं केलं. बाईक रायडींग सुरू केल्यानंतर वर्षाच्या आतच मी जगातील सर्वात उचं आणि खडतर समजल्या जाणाऱ्या खारदुंग ला टॉप सर केलं. खरंतर तर प्रत्येक प्रवास हा नवीन अनुभव देणारा असतो. मात्र, काही प्रवास हे आयुष्यभरासाठी धडे देऊन जातात. माझ्याही सोबत असच काहीसं घडलं.
माझा दरवेळी पुनर्जन्मच होतो बाईक चालवणे हे माझ्यासाठी निखळ आनंदाचा स्रोत आहे. मी प्रवासादरम्यान अनेक लोकांना भेटले, त्यांच्याकडून विविध गोष्टी शिकायला मिळतात. मी जर बाईक रायडींग करत नसते, तर कदाचित या सर्व गोष्टींना मुकले असते. आपला देश, आपली लोक, त्यांची संस्कृती जवळून पाहाता येते. प्रत्येक प्रवासात माणून नवा होतो, असं म्हणतात. मी तर म्हणेन माझा दरवेळी पुनर्जन्मच होत असतो. रस्त्यावर भेटलेले लोक, त्यांच्याशी झालेली मैत्री नेहमीच अनपेक्षित आणि संस्मरणीय असते. तुमच्यासोबत मित्र आणि बाईक असल्यास काहीही अवघड नाही, असं मला वाटतं. बाईकवरुन देशाबाहेर प्रवास करणाऱ्या भारतातील सर्वात तरुण महिला रायडर्सपैकी एक म्हणून मी 2019 मध्ये भूतानला भेट दिली. मी दिल्ली-लडाख-दिल्ली सर्किट, मध्य प्रदेश, कोलकाता, गोवा, दक्षिण भारतातील काही ठिकाणं देखील फिरले आहे. ज्यात तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा समावेश आहे. आतापर्यंत भारतभर 50,000 किमी पेक्षा जास्त प्रवास मी दुचाकीवर केलाय. हँडलबारच्या मागे आयुष्य काय असते हे अनुभवणे अभूतपूर्व आहे. पण, काही प्रसंग आयुष्यात असे घडले जगण्याची किंमत कळले.
..तेव्हा काही क्षणांसाठी वाटलं संपलं सगळं मला मोठ्या ग्रुपपेक्षा छोट्या ग्रुपसोबत राईड करायला जास्त आवडतं. अशाच एका राईडसाठी आम्ही 2018 मध्ये दोन मित्र आणि मी असे तिघेजण कर्नाटक-तमिळनाडूच्या सीमाभागात गेलो होतो. या ठिकाणी बांडीपूर (bandipur) नावाचे घनदाट जंगल आहे. याच जंगलात कधीकाळी चंदन आणि हस्तीदंत तस्कर वीरपन्ना राहत होता. हे क्षेत्र कित्येक किलोमीटरमध्ये पसरले आहे. डोंगररांगातून नागमोडी वळणाच्या रस्त्याने आम्ही तिघेजण दिवसभर फिरलो. आम्ही फिरण्यात इतकं मग्न झालो की सायंकाळचे साडेपाच वाजले तरी लक्षात आलं नाही. कुणाचंतरी घड्याळात चुकून लक्ष गेलं. सहा वाजता जंगल क्षेत्र बंद होतं असतं. त्यामुळे आम्ही लगोलग गाडीला स्टार्टर मारला आणि निघालो. आमच्याकडे बाईक चांगल्या असल्यातरी रोड चांगला नव्हता. त्यामुळे वेग कमीच होता. सूर्य मावळतीकडे झुकत होता. उंचचउंच झाडांमुळे लवकर अंधार होतो, हे आम्हाला माहित होतं. सध्या आमचं तिघांचही लक्ष सहा वाजण्याच्या आत मेनगेटजवळ पोहचणं होतं. कदाचित आम्ही तिघेही त्यात तंद्रीत गाडी चालवत असो. अचानाक काही अंतराव एक गाडी थांबलेली दिसली. ज्यावेळी तुम्ही जंगल क्षेत्रात गाडी चालवत असता. त्यावेळी एखादी गाडी पुढे थांबली असेल तर तुम्हालाही त्याच्या पाठीमागे थांबावं लागतं. हा गाडी चालवण्याच नियम आहे. त्याप्रमाणे आम्हीही थांबलो.
पण, पुढच्याच क्षणी आम्ही जे पाहिलं त्यामुळे आम्ही इतकं घाबरलो की काय करावं काही सुचेना. तिथं इतकी शांतता होती, की माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू यायला लागली. रक्तदाबाचा प्रेशर हातातील नसांमध्येही जाणवत होता. कारण, आमच्या तिघांच्या बाईकसमोर एक चित्ता उभा होता. तो इतका जवळ होता की त्याची एक झेप पुरेशी होती. असा प्रसंग येईल याची स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. आमच्यासमोर जिप्सी उभी होती. त्यामुळे त्यातील लोक सुरक्षित होते. पण, आम्ही पूर्णपणे मोकळे होतो. म्हणजे गाडी धड पुढेही नेता येणार नव्हती आणि मागे तर शक्यच नव्हतं. काही क्षणांसाठी आता संपलं सगळं अशीच माझी अवस्था झाली होती. पण, सुदैवाने चित्त्याने आमच्याकडे एक नजर टाकली आणि लगेच झाडाझुडपात गायब झाला.
भारतीय जवानाने वाचवला जीव 2018 साली आम्ही दिल्ली ते लेह लडाख सर्कीट अशी योजना आखली. दिल्लीपासून प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्यांदाच लेह लडाखला जात असल्याने उत्साह जरा जास्त होता. जसजसं दिल्लीपासून दूर होत हिमालयाकडे जात होतो, तसतशी थंडी जाणवायला लागली. आम्ही कोणत्याही राईडला निघाताना सर्व पूर्वतयारी करत असतो. म्हणजे थंडीत प्रवास करणार असू तर थर्मल किट, पावसाळ्यात वेगळं किट वगैरे. पण, खरं सांगू का? हिमालयातील थंडीत तुम्ही काहीही वापरलं तरी त्याचा परिणाम जाणवल्यावाचून राहात नाही. हिमालयाच्या पायथ्याशी पोहचेपर्यंत माझी प्रकृती हळूहळू ढासाळायला लागली. जिथून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होतो. तिथंपर्यंत मी कशीबशी पोहचले. माझा श्वास हेल्मेटमध्ये गुदमरायला लागला. अचानक शरीर गरम वाटू लागलं. मी गाडी थांबवली, तसे माझे सहकारी जवळ आले. म्हटलं मला अस्वस्थ वाटतंय. त्यांनी मला हात लावला तर माझं अंग तापानं फणफणत होतं. थर्मामीटर वर चेक केल तर 103 ताप होता. आम्ही अशा परिस्थितीत अडकलो होतो, की धड मागे जाता येईना की पुढे. कारण, तिथे काहीच सोय नव्हती. आणि आजच कुठल्याही स्थितीत जोजी ला (Zoji La) पास करायचा होता. शेवटी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही वर पोहतेपर्यंत बराच अंधार झाला होता. ताप आणि त्यात मायनस तीन डिग्री सेल्सिअस तापमानाने मला रात्री अस्थमा अॅटॅक आला. तिथे कोणतीही वैद्यकीय सुविधा नव्हती. अशा परिस्थिती माझ्या सहकाऱ्यांना काय करावं काही सुचेना. तेव्हा स्थानिक व्यक्तीने एका भारतीय जवानाला मदत मागितली. त्या जवानाने वेळेवर उपचार केले नसते. तर कदाचित परिस्थिती आणखी गंभीर झाली असती. या प्रसंगामुळे भारतीय जवानांबद्दल असलेला माझा आदर आणखी वाढला.
..तोपर्यंत सर्व मोटरसायकल समान आहेत!! ऑफ-रोड डर्ट ट्रॅक, ट्रेल आणि फ्लॅट ट्रॅकवर चालण्यासाठी देशातील सर्वोत्कृष्ट रॅली रायडर्ससोबत प्रशिक्षण घेण्याचीही मला संधी मिळाली आहे. बाईक चालवताना माझ्यासोबत घडलेली ही सर्वात चांगली गोष्ट होती. माझ्या हातात वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक येत असतात. मला बाजारात आलेल्या नवीन बाईक वापरून पाहण्याच्या अनेक संधी मिळाल्या आहेत. पण शेवटी मला असे वाटते की दुचाकी कोणती आहे, याने काही फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही कोणतीही मोटरसायकल चालवता तेव्हा तुम्हाला आनंद आणि स्वातंत्र्याची भावना महत्त्वाची असते. मोटरसायकल प्रवासाचा माझा सर्वोत्तम अनुभव एमपी टुरिझमचा आहे जिथे मला देशातील बाल आणि महिला सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व राष्ट्रीय उद्यानांमध्ये 2 आठवडे फिरण्याची संधी मिळाली. मला यापेक्षा जास्त आनंद वाटत नाही. त्या नोटवर, मी सर्वांना संदेश देईन - जोपर्यंत आपण आनंदी आणि सुरक्षित आहोत तोपर्यंत सर्व मोटरसायकल समान आहेत!! जमेल तितका प्रवास करा आणि जबाबदारीने बाईक चालवा.
बाईक रायडींगमध्ये शाररीक नाही तर मनाची मजबुती आवश्यक मी भारताच्या अनेक भागात बाईकने रायडींग केली आहे. आतापर्यंत प्रवासात मला अनेक अडचणी आल्या. बाईक रायडींगसाठी तुमची शाररीक क्षमता चांगली असणे आवश्यक आहे. यात कुणाचेही दुमत असण्याचं कारण नाही. पण, त्याही पलीकडे जाऊन तुमच्या मनाची मजबुती असणे जास्त आवश्यक आहे. कारण, तुमचे मनोबल काही कारणाने खचले तर शाररीक क्षमता असूनही काही उपयोग होणार नाही, असा माझा तरी अनुभव आहे. सोनिया अधिकारी, बाईक रायडर, बँगलोर Insta ID - Soniaaadhikary तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.