JOIN US
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / एक चूक अन् तुमचा जीव गेलाच समजा! मृत्यूच्या दाढेतून परतलेला Bike Rider

एक चूक अन् तुमचा जीव गेलाच समजा! मृत्यूच्या दाढेतून परतलेला Bike Rider

स्पिती व्हॅलीला राईड करताना जो अनुभव मिळाला तो मी आयुष्यर विसरणार नाही. आजही तो प्रवास आठवला की अंगावर काटा येतो. पण, त्यावेळी मला जे गवसलं त्यानं माझी छाती अभिमानाने फुलते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन, बाईकवरुन आतापर्यंत दीड लाख किलोमीटर राईड पूर्ण केली आहे. अजूनही प्रवास सुरुच आहे. यात सोलो, ग्रुपसह छोट्या-मोठ्या अनेक राईडचा समावेश आहे. मात्र, यात स्पिती व्हॅलीला राईड करताना जो अनुभव मिळाला तो मी आयुष्यर विसरणार नाही. आजही तो प्रवास आठवला की अंगावर काटा येतो. पण, त्यावेळी मला जे गवसलं त्यानं माझी छाती अभिमानाने फुलते. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. मी 90s किड.. 90 च्या दशकात बाईक टूरिंग आणि एक्सप्लोरिंगसाठी चालवणे हे एक प्रकारचं मिथ समजलं जायचं. त्याकाळात मी माझ्या कॉलनीच्या मैदानात काही लोकांना त्यांच्या 100-125 सीसी बाईकवर फिरताना पहायचो. त्यावेळी त्यांच्या गाडीचा इंजिन आवाज ऐकायला मला भारी वाटयचं. हिच गोष्ट मला बाईकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरली. काही वर्षांनंतर पप्पांनी आमच्या कुटुंबासाठी पहिली दुचाकी आणली, जी माझ्या बाईक ड्रायव्हिंग प्रवासाची एन्ट्री होती. पुढे 2013 मध्ये मी स्वतःची पहिली 180 सीसी बजाज पल्सर विकत घेतली. तेव्हापासून खऱ्या अर्थानं मी बाईक रायडींग क्षेत्रात पाऊल टाकलं. अन् कुटुंब विस्तारत गेलं या बाईकवर सोलो आणि ग्रुप राईड करत सुमारे 1 लाख किलोमीटर पूर्ण केलं आहे. माझ्या प्रवासातील सर्वोत्तम भाग म्हणजे मी व्हॅलिअंट रायडर्स ग्रुपमध्ये सहभागी झालो. त्यानंतर अनेक मित्र भेटत गेले आणि माझं बाईक रायडींगच कुटुंब विस्तारत गेलं. 180 सीसी बाईकवरुन थेट 400 सीसी वर दिवस बदलले, महिने उलटले, वर्षे सरली आणि 2018 मध्ये मी मस्क्युलर बजाज डोमिनार 400 सीसी बाईक घेतली. त्या गाडीवरील दुसरी ट्रिप मी थेट स्पिती व्हॅलीला गेलो. जगातील सर्वात धोकादायक रस्ता आणि भूप्रदेशावरील हा एक नरक प्रवास होता. एक छोटीशी चूक अन् तुमचा जीव गेलाच समजा. जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसला भेट देण्याचा माझा अनुभव आणि हिमवादळात अडकल्यावर काय परिस्थिती झाली, हे आजही आठवलं तरी अंगावर काटा येतो. निसर्गाचं वेळापत्रक फोलो करा या सर्व वर्षांच्या ड्रायव्हिंगमध्ये मी बर्‍याच गोष्टी शिकलो. त्यापैकी एक म्हणजे प्रवासाला जाताना तुमचं नाही तर निसर्गाचं वेळापत्रक फोलो करा. आम्ही प्रवास करत स्पितीला पोहचलो तेव्हा तेथील तापमान -2 डिग्री सेल्सिअर होतं. हाडं गोठवणारी थंडी होती. दोनचार कपडे घातल्यानंतरही आतमध्ये थंडी जाणवायची. अशा परिस्थितीत आमचा साहसी प्रवास सुरू झाला. निसर्गाची अवकृपा पण नशीबाची साथ.. बुद्ध पुतळ्याला भेट देणे आणि 150 लोकसंख्या असलेल्या सर्वात लहान गावांपैकी एक पाहण्यासाठी लांगझा गावात जाण्याची आमची योजना होती. गोठवणाऱ्या थंडीत भेट देऊन आम्ही हिक्कीम गावाकडे निघालो. जिथे समुद्रसपाटीपासून 14 हजार 567 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस आहे. त्यानंतर खरा खेळ सुरू झाला. अचानक बर्फवृष्टी सुरू झाली. आधीच उणे तापमान त्यात वरुन बर्फाचा वर्षाव, आम्हाला काय करावं काहीच सुचेना. अशाच अवस्थेत आम्ही काही तास तिथेच अडकून राहिलो. निसर्गाने जरी साथ सोडली असली तरी आमच्या नशीबाने साथ दिली. तिथं आम्हाला एक छोटासा ढाबा मिळाला. तिथं आम्हाला सर्वोत्कृष्ट जेवण मॅगी आणि चहा मिळाला. मी सर्वोत्कृष्ट का म्हटलं याचा अंदाज आलाच असेल. हा आमच्यासाठी मोठा दिलासा होता. एकामागून एक संकट.. यादरम्यान बर्फवृष्टी थांबली. आम्ही मोठ्या मेहनतीनं आमच्या बाईक तिथून काढू शकलो. पण, आमच्या अढचणी इथेच संपल्या नाही. आम्ही निघालो तेव्हा सर्वदूर धुक्याची चादर पसरली. पुन्हा आम्हाला धुके नाहीसे होईपर्यंत वाट पहावी लागली. काही वेळाने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. मात्र, पुढील 5 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता जो आधी फक्त चिखलाचा होता, तो आता सर्वात वाईट झाला होता. थोडाही बॅलन्स गेला तरी गाडी स्लीप होत होती. कसेतरी आम्ही काझा शहरापर्यंत दोन किमी तास या वेगाने खाली उतरण्यात यशस्वी झालो. मग, आम्ही प्लॅन बदलून दिवसभर इथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी आम्हाला जाणीव झाली.. प्रत्येकवेळी नियोजित वेळापत्रकाच्या मागे धावण्यापेक्षा आणि सर्व गोष्टी एकाच वेळी मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ठिकाण एक्सप्लोर करणे अधिक चांगले आहे. - सुदर्शन हंकारे, बाईक रायडर (Insta id- @sudarshanhankare) तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या