कडाक्याच्या थंडीत खारदूंगला पोहचेपर्यंत सर्दी आणि तापाने अंग फणफणायला लागलं होतं. ताप खूप असल्याने डोळ्यातून पाणी येत होतं. त्यामुळे रस्ता अंधुक दिसत होता. हेल्मेट असल्याने पुसताही येत नव्हतं. परिणामी डोळ्यांची आग व्हायला लागली. हातातली शक्ती गेली. गाडीचा हँडलवरची पकड आपोआप सैल झाली. काय करावं काही कळेना. अशात.. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. कॉलेजपासून मला स्वतःची बाईक असावी असं वाटायचं. पण, परिस्तिथीमुळं कधी त्या गोष्टीचा हट्ट नाही केला. कॉलेज संपल्यावर जेव्हा कमवायला लागलो तेव्हा सेकंड हॅन्ड बाईक घ्यावी असे विचार केला. पण, घरच्यांनी सांगितले नवीन घे. आणि अश्या प्रकारे 2013 साली आमच्या घरी पहिलं वाहन आलं. बाईक चालवता येत नसल्यामुळे बाईक आणायला मित्राला नेले. नंतर बाईक शिकायला 3 महिने लागले. बाईक 200 सीसी असल्यामुळे चांगलीच जड होती. शिकताना बऱ्याचवेळा पडायची. मला बाईक शिकायला जवळपास 6 महिने लागले.
बाईक पडणारा… आता मी चांगल्याप्रकारे बाईक चालवू शकत होतो. हळूहळू पैसे जमवून गरजेचे गिअर्स घेतले. हेल्मेट पहिल्या दिवसांपासून सोबत होते, रायडींग जॅकेट, लगेज बॅग, पायासाठी प्रोटेक्टिव पॅड. मित्रांसोबत 200-300 किमी राईड करू लागलो. प्रत्येक राईडला शिकाऊ असल्याने बाईक पडायची. मित्रांनी माझे नाव “बाईक पडणारा” असंच ठेवलेलं. लोणावळा, माथेरान, नाशिक, त्यानंतर राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा अश्या काही राईड झाल्या. आता स्वतःमध्ये चांगला आत्मविश्वास निर्माण झाला होता. लेह लडाखचा जीवघेणा प्रवास आमच्या मित्रांमध्ये राहुल होता, त्यालाही माझ्यासारखं साहसी प्रवास आवडायचे. 2015 मध्ये राहुलने लेह लडाख करायचं ठरवलं. सगळ्यांना विचारलं पण बजेट आणि सुट्टी अभावी, फक्त तीनजण तयार झाले मी, राहुल आणि रोहित. योजना आखली, प्रवास खूप लांब आणि मोठा असल्याने घरचे बाईक घेऊन जाऊ देणार नाही हे माहित होतं. आणि 3 लोकांसाठी कार घेऊन जाणे म्हणजे खूप खर्चिक काम होतं. तर आम्ही तिथं भाड्याने मोटारसायकल घ्यायचं ठरवलं. लेहला आम्ही बाईक घेतल्या राहुल आणि रोहितने बजाजची अवेंजर आणि मी 350 सीसी बुलेट घेतली. मी कधीही बुलेट चालवली नव्हती, त्यामुळे हा भीम पराक्रम मी कसा करेल यावर विश्वास नव्हता. पण. लेह आहे आणि जर विकल्प आहे तर बुलेट घेउया. असेही मी कधी बुलेट घेणार नव्हतोच. एक दिवस बुलेटचे कार्यक्षम इंजिन समजण्यात गेले. दुसऱ्या दिवसापासून माझा बऱ्यापैकी बुलेट वर हात बसला होता. बुलेटवर आम्ही लडाख केलं. आम्ही एक चूक केली होती. पाणी पिण्यासाठी थर्मास आणला नव्हता, त्यामुळे सोबत असलेलं पाणी, गोठेल एवढं थंड व्हायचं आणि तेच थंड पाणी पिऊन मला खारदूंगला पोहचेपर्यंत सर्दी आणि ताप आला होता. ताप खूप असल्याने डोळ्यातून पाणी येत होतं. तरी त्या परिस्थितीत पँगोग जवळ पोचलो. त्या दिवसाचा मुक्काम तिथे झाला. तिथं मी औषध घेऊन चांगली 9 तास झोप घेतली. दुसऱ्या दिवशी सर्दी ताप बरे झाले होते. आम्ही पुढच्या प्रवासासाठी तयार होतो. अश्या प्रकारे आम्ही आमचं लेह लडाख एक स्वप्न पूर्ण केलं.
आयुष्यात पहिल्यांदाच मोठा अपघात एव्हाना मी उत्तम बाईक चालवतो, यावर घरच्यांचा विश्वास बसला होता. पुढे मला एकदा असेच इंटरनेट वर भारताच्या स्वर्णिम चतुर्भुज (Golden Quadrilateral) बद्दल वाचले. राहुलला हे आधीच माहित होतं. त्याला विचारलं जायचं का? त्याने लागलीच होकार दिला. आम्ही परत आमच्या ग्रुप मध्ये विचारले. हे सांगितल्यावर चारजण अजून तयार झाले. मग आम्ही कार मध्ये पाचजण आणि मी एकटा बाईक वर असं जायचं ठरलं. एक वर्ष आमचं योजना आखण्यात गेलं. 2017 च्या नोव्हेंबर मध्ये आम्ही योजनेप्रमाणे निघालो. पहिल्या दिवशी मुंबई ते दिल्ली अशी योजना होती. पण, राजस्थानपर्यंत पोहोचलो आणि माझ्या बाईकचा अपघात झाला. टक्कर इतकी जोरात होती की बाईकचं मोठं नुकसान झालं. पण, बाईक चालू होत होती. मी गिअर्स घातले असल्यामुळे मला काहीच झालं नव्हतं.
मुक्काम पोस्ट वाराणसी त्या अपघातातून मनाला आणि डोक्याला सावरून पुढचा प्रवास चालू केला. दिल्लीच्या अलीकडे आम्ही पोहोचलो आणि तिथेच मुक्काम केला. पुढच्या दिवशी दिल्लीमध्ये रस्त्यावर एका मेकॅनिककडुन बाईक तात्पुरती ठीक करून घेतली. भारतीय आणि साधी मोटर सायकल असल्यामुळे कमी खर्चात काम झालं. आमच्या मारुती कारचं पण थोडं काम करून आम्ही संध्याकाळी आग्र्याकडे निघालो. 205 रुपये टोल भरून यमुना एक्सप्रेस वे वर रात्री बाईक चालवण्याची संधी मिळाली. हा भारतातला सर्वोत्तम रस्त्यांपैकी एक आहे. पुढे वाराणसी येथे मुक्काम केला. 1 दिवस तिथे दिला. गंगेच्या तीरावर मध्यरात्री बसल्यावर गंगेच्या पाण्याच्या खळखळ आवाजाने, आणि त्या पाण्याच्या स्पर्शाने एक छान उमेद आली. तिथल्या पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने खूप छान वाटलं.
स्वर्णिम चतुर्भुज विक्रम पुढे वाराणसीहून युपीमार्गे कोलकाता आणि तिथून दुर्गापूरला आलो. तिथे एका कारने जवळच्या गावातील एका माणसाला टक्कर दिल्यामुळे त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. त्यामुळे स्थानिक लोकांनी तिथे हायवेवरच्या गाड्यांची तोडफोड सुरू केली होती. तिथून कसेबसे सुटलो. पुढे विशाखा पट्टणम, चेन्नई, बंगळूर आणि मुंबई असा प्रवास झाला. 5846 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही 9 दिवसात पूर्ण केला. या प्रवासाची दखल इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डने घेऊन मला प्रमाणपत्र दिलं. कन्याकुमारी मध्ये हल्ल्याचा प्रयत्न आता आमची प्रवासाची भूक वाढली होती. 2017 मध्ये आम्ही अजून मोठा प्रवास करायचं ठरवलं. काश्मीर ते कन्याकुमारी हा धडकी भरवणारा प्रवास बऱ्याच जणांनी केला आहे. बहुतांश लोकांनी बाईक कन्याकुमारी किंवा काश्मीरपर्यंत पाठवून केला आहे. पण, आम्ही मुंबई-कन्याकुमारी-काश्मीर-मुंबई असं करायचं ठरलं. तसेच सोबत धनुष्कोडी करणार होतो. यावेळेस, राहुल आणि मी आम्ही दोघेच आमच्या दोन बाईकने जाणार होतो. 2017 नोव्हेंबर मध्ये आम्ही पहिल्या दिवशी 1200 किमीचा प्रवास करून सालेमला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलं. त्या दिवशी आमच्या प्रवासाचा वेग पावसाने खूप कमी झाला. रामेश्वरम वरून संध्याकाळी सात वाजता आम्ही कन्याकुमारीसाठी निघालो. कन्याकुमारी मध्ये तिथल्या काही उपद्रवी मुलांनी आमच्या बाईकचा पाठलाग करून हल्ला करायचा प्रयत्न केला. पण, ते एकदोन किमीपर्यंतच आले. या आशेने की आम्ही परतणार याच वाटेने. पण, आम्ही खंबीरपणे काही झालं नसल्यासारखे गेलो आणि आलो.
रात्रीचा भीतीदायक प्रवास रात्री अडीच वाजता हॉटेल मध्ये गेलो. रात्री आवरून झोपायला पहाटेचे साडेचार वाजले. दुसऱ्या दिवशी कन्याकुमारीला थोडे फोटो काढून रात्री महामार्ग 44 वरून प्रवास सुरू केला. कन्याकुमारी, बंगळूर,, हैद्राबाद, नागपूर, मध्य प्रदेश पुढे सागर शहरात थांबून बाईक सर्व्हिस करून घेतली. एव्हाना आम्हाला सातारा कोल्हापूरमध्ये 5 डिग्री सेल्सिअस तापमान, कर्नाटकमध्ये भयंकर उकाडा आणि तामिळनाडू मध्ये वादळी वारा आणि पाऊस. पुढे मध्य प्रदेशपर्यंत चांगले गरम वातावरण भेटले. पण आता थंडी वाजत होती. पुढे हरियाणा आणि पंजाबमध्ये काही लोक रात्री महामार्गावर तलवारी घेऊन फिरताना दिसले. सुरुवातीला भीती वाटली. पण, नंतर त्याच लोकांना पुढे ही बघून त्याची सवय झाल्यासारखे भीती वाटणे बंद झाले. काही अंतराने महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन असल्या कारणाने 10 किमी आम्हाला जंगलातून रस्ता बदलून प्रवास करावा लागला. तो अनुभव पण छान होता. पुढे उधमपूरला थंडी खूप वाढली. तापमान -2 डिग्री सेल्सिअस झालं होतं. आता थंडीमुळे रायडींग जॅकेटला किती कप्पे आहेत आणि त्या कप्यांमधून किती हवा येते हे कळत होते.
पुन्हा इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद थंडी इतकी होती की हात कोल्ड बर्न होणार असं वाटत होतं. हळूहळू तापमान घटत चाललं होतं. काश्मीरसाठी अजूनही बराच वेळ होता. साधारण 9 वाजले होते आणि रस्त्यावर स्मशान शांतता होती. त्या रस्त्यावर बाईक थांबवायला देखील भीती वाटत होती. त्यामुळे शेकोटी करायला काडेपेटी आणि अंगावर घ्यायला रेनकोट असून पण बाईक थांबवावी वाटत नव्हती. त्या थंडीचा मारा अंगावर घेऊन पुढे जात होतो. आता तापमान -3 पर्यंत खाली गेलं होतं. आमची परिस्थिती अजून वाईट झाली. हात इतके कुडकुडत होते की बाईकचा हॅन्डल देखील व्यवस्थित पकडता येत नव्हता. थोडे पुढे आम्हाला एक ढाबा दिसला, क्षणाचाही विचार न करता आम्ही दोघे उतरलो आणि शेकोटीचा शेक घेऊ लागलो. आम्हाला बघून थोडावेळ तेही चक्रावले. पण, लगेच त्यांना आमची परिस्थिती लक्षात आली. तिथं चहा पिऊन आम्ही थोडे स्थिरावून पुढे निघालो. थंडीचा जोर अजूनही वाढत होता. साधारण तापमान -5 अंश सेल्सिअस झालं असेल. लवकरात लवकर हॉटेल शोधलं आणि त्या जीवघेण्या थंडीपासून सुटका केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बाईकवर बर्फ पडलेला होता. पुढे तिथून दाल लेकपासून अमृतसर, अजमेरला आलो. अजमेरपासून मुंबई आम्ही 18 तासात गाठली. या प्रवासात आम्ही सर्व ऋतू अनुभवले. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि बर्फवृष्टी सुद्धा. साधारण 7800 किमीचे अंतर आम्ही 11 दिवसात पूर्ण केला. याची देखील नोंद इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डने घेऊन मला प्रमाणपत्र दिलं.
2019 मध्ये प्रसिद्ध अशा सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया करायचं ठरवलं. राहुल पण सोबत होताच. प्रवासाचं अंतर कमी होतं. पण, रस्ते खूप खराब होते, त्यामुळे 100 किमी पूर्ण करायला सुद्धा 6-7 तास लागणार होते. याची जाणीव ठेवून आणि सुट्यांचा ताळमेळ ठरवून आम्ही बाईक गुवाहाटीला पाठवल्या. दिवाळीनंतर आम्ही गुवाहाटीला गेलो. अरुणाचलचं परमिट आधीच काढलं होतं. त्यामुळे आम्ही अरुणाचलच्या दिशेने प्रवास सुरु केला. अरुणाचलला पोहचून आम्ही बुम्ला पाससाठी परमिट काढले, त्यात बराच वेळ लागला. दुसऱ्या दिवशी बुम्ला पास सुरू केला. माझी स्वतःची मोटरसायकल या वेळेस सोबत होती. पण, कार्बोरेटर बाईक असल्यामुळे जास्त उंचीवर गेल्यावर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ती बंद पडत होती. बाईकची शक्ती सतत जात होती. याची कल्पना मला आधीच होती. म्हणून मी थांबत थांबत येत होतो. लडाखच्या तुलने मध्ये इथे रस्ते खूप खराब आणि भयंकर होते. लडाख पेक्षा इथे 30 पटीने अधिक साहस पणाला लागणार होतं.
वेगळ्या भारताची ओळख.. बुम्ला पासला चीनने अतिक्रमण केलेल्या सीमेरेषेवर जाऊन आम्ही परतलो. अरुणाचल मध्ये मराठी सैनिक बऱ्यापैकी आहे, तिथं आम्ही मराठा रेजिमेंटला भेटलो. जेव्हा ते आम्हाला पाहायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आनंद हा स्पष्ट दिसायचा. महाराष्ट्राच्या गाड्या पाहून त्यांना खूप आभिमान वाटायचा. अरुणाचलसोबत आम्ही पुढे, तवंग, नागालँड, मिझोराम, मणिपूर केलं. आम्हाला सीरिया मध्ये जीप वर असतात तसे काही बंदूकधारी ड्रेस मध्ये लोक दिसले, आधी भीती वाटली नंतर समजले कि ते आर्मीचे लोक होते. बऱ्याच ठिकाणी आम्हाला आर्मीचे लोक बॉम्ब डिटेक्टरने काही भागात पाहणी करताना दिसले. मनिपूर मध्ये बहुतांशी लोक शहराबाहेर कामला जातात. पुढे त्रिपुरा आणि शेवटी मेघालय असा प्रवास केला. मेघालय मध्ये दोन दिवस जास्त थांबून दावकी नदी बांग्लादेशची सीमा आणि भूतानच्या सीमेवर जाऊन आलो. ह्या प्रवासातला अनुभव हा खरंच नवीन आणि अफलातून होता. या प्रवासात मी पहिल्यांदा एक वेगळा भारत पहिला होता.
आतापर्यंतच्या राईडपैकी सर्वात आव्हानात्मक प्रवास या प्रवासात पहिल्या दिवसापासून माझ्या बाईकला अडचणी येत होत्या. त्रिपुराला जाताना रस्त्यातील खड्ड्यांमुळं बाईकचा हॅन्डल तुटला. आता सगळे संपले असे वाटत असताना ते वेल्डिंग करून चालवले. बाईकच्या समस्यांची आता सवय असल्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून तात्पुरते उपाय करून आम्ही पुढे जात होतो. बऱ्याचवेळा कित्येक किलोमीटर रस्त्यांवर माणसं दिसत नव्हती. रस्त्यांवर वाहनं तर दुर्मिळ होती. आर्मीशिवाय जास्त माणसे बऱ्याच भागात नव्हती. मेघालय आणि अरुणाचल सोडून बाकी ठिकाणी पर्यटक फिरकत नाही. बहुतेक ठिकाणी 4-5 तास माणसे दिसायची नाही. काही ठिकाणी जीपीएस वर लोकेशन पण भेटायचे नाही. हा सर्व पहिला अनुभव असल्याने मन आणि डोकं जागेवर ठेवून प्रवास करणे. स्वतःवर विश्वास ठेवणे या सर्व गोष्टींचा एक वेगळा अनुभव होता. आतापर्यंत मी केलेल्या सर्व कठीण राईडपैकी ही माझी सर्वात आव्हानात्मक राईड होती. कारण यामध्ये शाररीकपेक्षा मानसिक शक्तीचा कस लागत होता. साधारण 3500 किमीचे अंतर आम्ही 9 दिवसात पूर्ण केलं.
बाईक आता आयुष्यातील अविभाज्य घटक या खडतर प्रवासासाठी इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डने मला प्रमाणपत्र दिलं. या पुरस्कारांची या निमित्ताने हॅट्रिक झाली. या तीन राईडमुळे मला पूर्ण भारत भ्रमण करायला मिळालं. सर्व प्रकारच्या लोकांशी भेटणे, त्यांच्यासोबत उठणे बसणे, त्यांच्यासोबत जेवणे. याचा छान अनुभव आला. सहज म्हणून घेतलेली मोटरसायकल आज माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. मोटरसायकल शिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. माझ्या घरच्यांनाही आता या गोष्टीची सवय झाली आहे. प्रत्येक मोठ्या राईडनंतर ही आता तुझी शेवटची राईड नंतर कुठे जायचे नाही म्हणून बोलणारे माझे बाबा, माझ्या प्रत्येक राईडच्या आधी बाईकचे काम असले की आधी मदतीला धावून येतात. माझ्या मोटरसायकलचे काम करणारा माझा मित्र सागर यांच्याकडून डोंबिवली रायडर क्लबशी ओळख झाली. क्लब सोबत बऱ्याच दिवसांपासून जोडल्या गेल्यामुळे सोबत केलेल्या छोट्या राईड ग्रुप रायडींग कशी असते आणि रायडींग स्किल्स याबदद्ल कळले. शीस्तबद्धता हे या ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. सोलो रायडर ते ग्रुप रायडर असे बरेचसे कौशल्य हळूहळू आत्मसात केले. - सागर रांजणकर, बाईक रायडर (Insta = travel_with _sagar) तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.