एके दिवशी मी अचानक आजारी पडले. मला Intra-cranial Hypotension या आजाराचं निदान झालं. मी उठून बसले की माझ्या कवटीतील Spinal fluid leak व्हायचं. त्याने डोक्यात खूप तीव्र स्वरुपाच्या वेदना होत असल्याने मी काहीच करू शकत नव्हते. अक्षरशः अंथरुणाला खिळले होते. न्युरोलॉजिस्टच्या उपचारानंतर जवळ जवळ दीड-एक महिन्यानंतर मी हळूहळू बरी होऊ लागले. डॉक्टर म्हणाले आता तुम्ही तुमच्या कामाला वैगरे जाऊ शकता. पण, यापुढे तुम्ही टू व्हिलर चालवू शकत नाही किंवा मागे बसूही शकत नाही, हे ऐकून मला धक्का बसला. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. टू व्हिलर वर फिरायची सवय लहानपणापासून होती. लहानपणी आई-वडील दोघेही ऑफीसला जात असल्याने आम्ही दोघं भावंड कॉटन ग्रीनला आजीकडे सोमवार ते शुक्रवार राहायचो आणि शनिवार-रविवार बोरिवलीला. हे दर आठवड्याचं बोरिवली कॉटन ग्रीन येणं-जाणं बाबांच्या स्कूटरने व्हायचं, I guess त्यामुळेच टू व्हिलरने फिरायची मजा यायला लागली. आठवीपासून शाळेत येताना जाताना सायकल वापरून Balance करता येऊ लागला. ते दिवसचं भारी होते. डॉक्टरांचं ते वाक्य ऐकून मला धक्काच बसला पुढे लग्नानंतर स्वतःची अॅक्टिव्हा आली. त्याने कॉन्फिडन्स आणखी वाढला. शाळेत (कामाच्या ठिकाणी) रोज स्कूटरने ये-जा चालू झालं. पण, एके दिवशी मी Intra-cranial Hypotension आजारामुळे अंथरुणाला खिळले. या आजारात मी उठून बसले की माझ्या कवटीतील Spinal fluid leak व्हायचं. त्याने डोक्यात खूप वेदना होत असल्याने मी काहीच करू शकत नव्हते. न्युरोलॉजिस्टच्या उपचारानंतर जवळ जवळ दीड-एक महिन्यानंतर मी हळूहळू बरी होऊ लागले. पण, या काळात मला बराच मानसिक त्रास झाला. मला वाटले, मी ह्यातून परत पुन्हा उठून बसू शकेन की नाही. पण डॉक्टरांच्या योग्य उपचाराने मी बरी झाले. डॉक्टर म्हणाले आता तुम्ही तुमच्या कामाला वैगरे जाऊ शकता पण यापुढे तुम्ही टू व्हिलर चालवू शकत नाही किंवा मागे बसू ही शकत नाही, हे ऐकून मला धक्का बसला.
अन् एक दिवस माझ्या पार्कींगमध्ये लाज्जो आली थोडे दिवस रिक्षाने प्रवास केला. मग एक दिवस नवरा आणि घरच्यांना पटवून दिलं की स्कूटरपेक्षा जास्त हादरे तर रिक्षात बसतात. त्यानंतर हळूहळू स्कूटरवरचा प्रवास पुन्हा सुरू झाला. एक दिवस माझ्या मनात आलं की ही योग्य वेळ आहे, आपली बाईक घेऊन त्यावरून भटकंती करायची. त्यासाठी नवऱ्याला मस्का लावून-लावून त्याला राजी केलं. आणि एके दिवशी शाळेतून येताना बजाज शोरुममध्ये जाऊन Avenger cruise 220 पाहून लगेच बुक करून टाकली. बरं सांगायची गोष्ट म्हणजे मला तोपर्यंत फक्त स्कूटर येत होती. पण, गिअरड् बाईक मी कधीच चालवली नव्हती. शोरुममधला सेल्समन म्हणाला," मॅडम राईड घेणार का?" म्हटलं, “नको, बुक करा बाईक”, आता त्याला काय सांगणार मला बाईक चालवता येत नाह म्हणून? अश्याप्रकारे 12/12/2019 रोजी माझी ‘लाज्जो’ (माझ्या BTW माझ्या स्कूटरच नाव ‘धन्नो’ आहे) आली. मला उचलून का घ्यायचीय बाईक? ती शोरुम मधून आणताना नवऱ्यानेच आणली. ती अख्खी रात्र मी मनातल्या मनात गियर्स पाठ करत होते, वन डाऊन फोर अप. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला म्हटलं घेऊन जाऊ का रे शाळेत बाईक, करू का ट्राय? तो म्हणाला जा बिनधास्त काही लागलं तर कॉल कर आणि मग हळूहळू चालवत मध्येच गियर चेंज करताना बाईक बंद पडत पहिला दिवस सुखरूप पार पाडला. मग हळूहळू चालवत रोज प्रॅक्टिस केली BTW मी बाईक घेतलेली पाहून मला लोकं म्हणाले, तुला झेपेल का बाईकचं वजन?", तेव्हा मी त्यांना गंमतीने म्हणायचे, “मला उचलून का घ्यायचीय बाईक?”
ती घोषणा म्हणजे आनंदावर विरझण होतं मग पहिली ट्रीप म्हणजे दादरला सिद्धीविनायक, नंतर मरीन ड्राईव्ह, एके दिवशी कॉलनीतल्या मैत्रिणींसोबत पालघरला. आता वाटलं जमतय की आपल्याला. अशातच टिव्हीवर एके दिवशी, एक घोषणा ऐकली…. ‘मेरे प्यारे देशवासियों कल से भारत में लॉकडाऊन लगाया जाएगा’ आणि मग मी आणि माझी लाज्जो काय अख्खा देशच घरी बसला. असचं कधी तरी कॉलनीतल्या कॉलनीत बाईक चालवायची. पुढे जूननंतर लॉकडाऊन सैल झाल्यावर पालघरला बाईकवरुन रविवारी सकाळी जाऊन येऊ लागले. मग ‘बाईकरनी ग्रुप’ जॉईन केला. त्यांच्याबरोबर ग्रुप राईड्स केल्या. अशातच 2021 मध्ये माझा 35 वा वाढदिवस येत होता, त्यावेळेस मला सोलो राईड करायची डोक्यात होतं. म्हटलं, सोलो राईडचा श्रीगणेशा आपण आदिशक्तीच्या आर्शीवादाने करू म्हणून महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठ करायची ठरवलं. पुन्हा एकदा निराशा.. पण हाय रे माझं कर्म महाराष्ट्रात एप्रिल 2021 मध्ये पुन्हा लॉकड्राऊन लागलं. माझी साडेतीन शक्तिपीठांची सोलो राईड मी 12 मे, अक्षय्य तृतीया (साडे तीन मुहुर्तापैकी एक) सुरू करणार होते ती बारगळली. याच दरम्यान आम्ही घरातील सारे कोव्हिड पॉझिटिव्ह झालो आणि त्यात आम्ही आमच्या पप्पांना (सासरे) गमावून बसलो. पुढे बराच काळ आम्हाला यातून शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या सावरायला वेळ लागला. परत एकदा नवरात्र सुरु झाल्यावर साडेतीन शक्तिपीठं डोळ्यासमोर येऊ लागली. मग ठरवलं बस्स आता ही राईड करायचीच. नवऱ्याशी आधी बोलले, तो थोडासा कुरबुरला पण फक्त माझ्या सेफ्टीबद्दल. मग मी त्याला म्हटलं की मी हे करू शकेन. मग लेकाशी (वय वर्ष 9) बोलले तर तो म्हणाला मम्मा, मी बाबा आणि आजीसोबत राहीन. नंतर मी निवांत सासूबाई आणि आई वडिलांशी बोलले, ते तिघजण जरा काळजीत होते, तिघांनाही विश्वासात आणि निघायची तारीख नक्की केली. 7 नोव्हेंबर 2021..
वेळ खूप कमी होता, पण जोमाने Planning ला लागले. मॅपवरून रूट ठरवला कुठं रहायचं ते ठरवलं. इतर बाइकर्सचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली, Know your bike च training घेतलं ज्यात तुम्हाला तुमच्या बाईकची बेसिक Anatomy शिकवतात आणि बाईक बिघडल्यास जुजबी रिपेरिंग कसं कराराचं ते शिकवतात. दरम्यान सोबत न्यायचा टूल किट रेडी केला. छोट्या छोट्या ब्रेकफास्ट राईडस केल्या. अशी एकदाची जोरदार तयारी करुन 6 नोव्हेंबरला रात्री अंथरूणावर पडले. पण, काही केल्या मला झोपच येईना. Butterflies in my stomach. शेवटी कसबस 2.30 च्या पुढे डोळा लागला आणि 4 वाजता अलार्म वाजल्यावर उठले. गिअर अप होऊन देवाच्या आणि मोठ्यांच्या पाया पडले. लेक झोपेत होता त्याला जरासं कुरवाळून, नवऱ्याला एक घट्ट मारुन मी निघाले. शक्तिपीठे करायला, कि स्वतःला शोधायला… मुंबई सोडल्यावर जाणवलं की अरे आपण हे करतोय पहिला मुक्काम कोल्हापूर होता. वाटेत माझी बाईक खंडाळा घाटात एका शार्प टर्नला बंद पडली आणि माझा धीर खचला, खटपट करुनही काही ती सुरु होईना. सेल्फ मारून, फर्स्ट गियरमध्ये गाडी उचलायचा प्रयत्न केला. पण, ती काही जागची हालेचना, ती उचलली जाईना. मागून बरेच बाईकर्स येत होते. पण, त्या शार्प टर्नला कुणीही थांबायला तयार होईना. वाटलं आता टोईंग व्हॅनला बोलावून बाईक टाकून घर गाठावं लागणार. पण, त्याआधी एक शेवटचा ट्राय म्हणून मागून येणाऱ्या बाइकर्सना हात दाखवला आणि एक देवदूत Bajaj Avenger वर अवतरला, त्याने मला problem विचारला आणि म्हणाला थांबा मी माझी बाईक आधी थोडी वर बाजूला थांबवतो. त्याने त्याची बाईक वर बाजूला थांबवली आणि माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, “तुम्ही बाईक स्टार्ट करा मी धक्का मारतो”.
तो देवदूत नसता तर आज माझ्याकडे तुम्हाला सांगायला काहीच नसतं मी बाईकवर बसून बाईक स्टार्ट केली फर्स्ट गिअरवर टाकून रेस केली. त्याने बाईकला धक्का मारला आणि बाईक जागची हालली आणि पुढे गेली, तो मागून जोरात ओरडला, “मॅडम थांबू नका, पुढे जा, जात रहा” (आयुष्याचा कानमंत्र). मीही थांबले नाही पुढे चालवत राहिले आणि घाट पार करून वर चढले. घाट माथ्यावर आल्यावर जिथे सारे बाईकर्स होते, तिथे जाऊन त्याची वाट पाहत थांबले. कारण, मला त्याचं नाव विचारायचं होतं, त्याला थँक्यू म्हणायचं होतं. पण अर्धा तास झाला तरी तो काही दिसलाच नाही. जणू काही अदृश्यच झाला तो. शेवटी त्याचाच पुढे जाण्याचा कानमंत्र शिरसावंद्य मानून पुढचा प्रवास चालू केला. आज आता या माध्यमातून जर का तो देवदूत हे वाचत असेल तर त्याला खूप धन्यवाद देऊ इच्छिते. कारण त्याने जर ती मदत मला केली नसली तर आज माझ्याकडे तुम्हाला सांगायला काहीच नसतं. पुढे मग घाट लागला की देवाचं नाव होत मी तो पार करु लागले. आणि पहिल्या दिवशी 398 किमी पार करून माझ्या पहिल्या मुक्कामी कोल्हापूरला पोहोचले. संध्याकाळी दर्शन करून लवकर जेवून झोपले. कारण फार दमले होते दुसऱ्या दिवशी तुळजापूर गाठायचं होतं. 8 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता कोल्हापूरहून तुळजापूरला जायला सुरुवात केली, या दिवसाचा प्रवास अगदी छान झाला. फक्त तुळजापूरला जवळ पोहोचल्यावर गुगल मॅपने जरासा घोळ घातला. पण ठीक आहे, ऐसे बड़े बड़े राईडस में ऐसी छोटीछोटी बाते होती रहती है. संध्याकाळी दर्शन घेऊन मी रात्री लवकरच झोपले.
मनातल्या मनात स्वत:ला जाम शिव्या घातल्या 9 नोव्हेंबरला माझ्या खऱ्या परीक्षेचा दिवस होता. मला पहाटे 3.15 लाच जाग आली. तुळजापूर ते माहूरगड हे अंतर 340 किमी आहे. पण, हा रस्ता फार खराब आहे आणि हे अंतर पार करायला 9 तास लागतात असं कळलं होतं. म्हणून म्हटलं आज थोडं लवकर प्रवास सुरू करू म्हणून 4 वाजता माहूरला निघाले. तुळजापूर सोडून हायवेला 4.20 ला लागले आणि समजलं इथे आजूबाजूला गावच नाहीये आणि फक्त मिट्ट काळोख आहे. पण पुढे जात राहायचं ठरवलं. इथे रोड छान होता 65-75 स्पिडला होते. पुढे औसा ते लातूर हा हायवे नव्हता म्हणण्यापेक्षा तो साधा रस्तादेखील नव्हता, खड्डे, दगड आणि धुळीचं साम्राज्य होतं. रस्त्यावर फक्त मोठे ट्रक्स, खड्डे आणि प्रचंड धूळ होती. आणि हो मिट्ट काळोख. मनात म्हटलं यातल्या एखादया खड्ड्यात चुकून पडले तर मागून येणाऱ्या एखाद्या ट्रकखाली नक्कीच येणार. मनातल्या मनात स्वत:ला जाम शिव्या घातल्या. शिवाय ही राईड सुरू करायच्या आधी ह्याच रस्त्यावर एक महिला रायडरचा मृत्यू खराब रस्त्यामुळे झालेला ऐकलं होतं, म्हणून मनात जराशी टरकले होते. या बया ही बाई हिथ एकटीच आलीया.. अश्याप्रकारे एकीकडे स्वतःला शिव्या घालत एकीकडे देवाचं नाव घेत सकाळी 6:45 ला लातूरला पोहोचले आणि एका नुकत्याच उघडलेल्या चहाच्या टपरीवर चहासाठी थांबले. तिथे एक प्रवासी ट्रॅक्सही थांबली होती आणि स्त्री-पुरुष प्रवासी चहा घेत होते. मी हेल्मेट काढल्यावर तिथल्या लोकांच्या नजरा माझ्यावर खिळल्या. गरम गरम चहाचे दोन घोट एक पोटात गेल्यावर मला जरा बरे वाटले आणि मी चहावाल्याला विचारलं या पुढचा नांदेड पर्यंतचा रस्तादेखील असाच खराब आहे का? तो म्हणाला, हो ताई. मग हळूहळू माझ्या कानी संवाद आले, “या बया ही बाई हिथ एकटीच आलीया” “काय खरं न्हव” आणि इतर… हे सगळे तेथील उपस्थित डोईवरून पदर घेणाऱ्या स्त्रियांचे संवाद होते. त्यांची जरा भीड चेपल्यावर त्या माझ्याजवळ आल्या आणि मी कुठून आले, कुठे चालले हे प्रश्न मला त्यांनी विचारले त्यांच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाल्यावर त्यांना माझं कौतुक वाटलं, त्यांनी मला माझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप आर्शीवाद दिले आणि त्या निघून गेल्या.
माझा त्या बायकांशी संवाद चालू असताना तिथे एक वयस्कर खान चाचा मला निरखून पाहत होते. माझा दोन कप चहा पिऊन झाल्यावर मी फोनवर गुगल मॅप सेट करून निघताना ते चाचा माझ्याजवळा आले आणि मला म्हणाले, “बेटा तू या मॅपप्रमाणे गेलीस तर तुला असाच रस्ता मिळेल त्याऐवजी इथून पाच-सहा किमीवर एक फाटा लागेल तिथून तू डावीकडे वळ, हा रस्ता तुला 25km लांब पडेल पण आत्ताच्या या रस्त्यापेक्षा हा रस्ता बराच चांगला आहे आणि बेटा मी तुझा प्रवास नीट व्हावा यासाठी अल्लाकडे दुवा मागेन, जपून जा”. मी त्यांना Thank you चाचा म्हणत पुढे निघाले. पुढे सहा किमी चाचांनी सांगितलेला फाटा आला आणि माझी द्विधा मन:स्थिती झाली. मनात आलं सरळ गुगल मॅप follow करावं की अनोळखी चाचांचा सुज्ञ सल्ला? And believe you me I trusted the man over machine. चाचांच्या सल्ल्यानुसार मी तो लांबचा रस्ता घेतला आणि देवाचे आणि चाचांचे मनोमन आभार मानले. तो रस्ता काही अगदी गुळगुळीत नव्हता पण आधीच्या रस्त्यापेक्षा बराच चांगला होता. म्हणजे मला होडीत न बसल्यापेक्षा बाईकवर बसल्यासारख वाटत होतं. साधारण नांदेड जवळ येऊ लागल्यावर मला पोट नावाच्या अवयवाची जाणीव होऊ लागली पण आजूबाजूला एकही नाश्ता करण्यासारखं ठिकाण दिसत नव्हतं आणि बिस्किट खायला थांबवून मला माझी लय बिघडायची नव्हती मग अचानक आठवलं नांदेडला तख्त सचखंड हुजुर साहिब गुरुद्वारा आहे. तिथे आपल्याला मस्त आलू पराठा खायला मिळेल आणि त्या लालसेपोटी मी उरलेलं अंतर पार करून गुरुद्वाऱ्यापाशी पोहोचले. तिथे पाच-सहा ढाबे होते आणि मस्त पराठ्याचा सुवास होता. आणि मग आधी पोटोबा मग विठोबा नुसार मस्त एका ढाब्यावर आलू पराठा विथ मख्खन मार के आणि लस्सीवर ताव मारला.
ढाब्यावरचे आचारी आणि इतर काम करणारे माझ्या अधाशी खाण्याकडे पाहत होते. पण मला त्याबद्दल अजिबात काहीही वाटत नव्हतं. खाऊन झाल्यावर मला गुरुद्वाऱ्यात जायचे होते. पण, माझ्या कडचं बाईकवरच सामान आणि बाईकचा मोठा प्रश्न होता. तेथील मालकांना म्हणजेच पापाजींना माझी अडचण कळली असावी, ते मला म्हणाले “पुत्तर तुस्सी जाव, मैं त्वाडे सामान दा होर तेरी बाइक दा ख्याल रखांगा, तुस्सी माथ्ठा टेक के आओ”. थोडसं चाचरत मी बाईक अगदी ढाब्यासमोर लावली आणि कॅमेराची बॅग पापजींना देऊन आत दर्शन घ्यायला गेले. आत गेल्यावर फारच प्रसन्न वाटलं. मी बाहेर येऊन माझी बाईक आणि सामान घेतलं त्या बदल्यात पापाजींना थोडेसे पैसे देऊ केले ते त्यांनी नाकारले, त्याबदल्यात मी एक फोटो काढू का तुझ्यासोबत अस विचारले मी अर्थात होकार दिला आणि सर्वांसोबत फोटो काढले. गियर अप होताना तिथल्या काम करणाऱ्यांनी मला सांभाळून जाण्यास सांगितले. अश्याप्रकारे मन आणि पोट पूर्ण भरून नांदेडहून मी 11 वाजता माहूरच्या दिशेने निघाले आणि परत एकदा खराब रस्त्यांच्या साथीने मी दुपारी 3 वाजता माहूरला पोहोचले. म्हणजे 346 किमीच्या अंतरासाठी मला 11 तास लागले होते. नेहमीप्रमाणे संध्याकाळी दर्शन करून प्रचंड दमल्यामुळे 8 वाजताच झोपले. 10 नोव्हेंबरला माहुरहून थेट नाशिकला न जाता मधे औरंगाबदला मुक्काम करायचा बेत केला. तुळजापूर माहूरच्या प्रवासामुळे खूप थकायला झालं होतं. म्हणून म्हटलं थोडं आराम करू. औरंगाबदला माहूर ते औरंगाबाद प्रवास तसा थोडा बरा होता. औरंगाबादला 2.30 पोहोचल्यावर जेवून मस्त ताणून दिली ते थेट संध्याकाळी 7 वाजता उठले. मग पेट्रॉल भरायला एक फेरी मारली आणि बस्स बाकी फक्त आराम केला.
इप्सित साध्य झालं.. 11 नोव्हेंबरला औरंगाबाद ते नाशिक असे कमी अंतर असल्यामुळे सकाळी 8 वाजता निघाले आणि 11.30 ला नाशिकला पोहोचले. तब्बल चार दिवसांनी गरम पाण्याने आंघोळ केली. कारण आतापर्यंतच्या सगळ्या हॉटेल्समध्ये सकाळी 6 ते 10 गरम पाणी यायचे. आणि गरम पाण्याने आंघोळ म्हणजे चैन असते, याची अनुभुती आली. दुपारचं जेवण करून साधारण 2.30 ला वणीला जायला निघाले आणि 4 वाजला तिथे पोहोचून छान दर्शन करून 7.30 वाजता पुन्हा हॉटेलला पोहोचले. आणि मनात आल आपण हे केलं, एकटीने साडे तीन शक्ति पीठं बाईकवर. आता उद्या सकाळी आरामात हॉटेलवर नाश्ता करून निघायचं आणि जेवायला घरी.
घरी जाताना मनात विचारांचं काहूर माजलं होतं 12 नोव्हेंबर सकाळी 9.30 ला हॉटेल वरून चेक आऊट करून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. मनात खूप विचार गर्दी करत होते, आता पुढचं डेस्टिनेशन काय? कधी? अश्या सगळ्या विचारात इगतपुरी कधी गेलं हे कळलच नाही आणि मग कसारा घाटात स्वतःला बजावलं की बस्स झाले हे विचार रस्त्यावर लक्ष केंद्रीत कर, घरी सुखरूप पोहोचले तरच पुढची राईड वैगरे आणि मग शांत मनाने बाईक चालवत राहिले. ठाण्यात आल्यावर ट्रॅफिकने मुंबईत पोहोचल्याची जाणीव करून दिली. गर्दीमुळे थोडे वैतागले, रिक्शावाल्यांना शिव्या घालत घरी पोहोचले तर घरचे सगळे मी आधीच लोकेशन शेअर करत असल्यामुळे ते सगळे अगदी जंगी स्वागताला तयार होते. मी गेटच्या आत बाईक टाकल्यावर आईने आरती केली, भाकर तुकडा ओवाळून टाकला, लेकाने अगदी घट्ट मिठी मारली, बाबांनी आणि सासूबाईनी अभिनंदन करून डोक्यावरून हाल फिरवला आणि नवरोबाला मी घट्ट मिठी मारली. मग माझ्या ‘लाज्जो’ला मी मिठी मारत तीचे आभार मानले. या सोलो राईडने मला खूप वेगळं बनवलं, स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवले, लोकांकडे कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय पहायला शिकवलं. आता पुढे अनेक नवे Destinations खुणावतात, पाहू कसं जमतय ते….. - रिया भाटकर, बाईक रायडर, मुंबई. तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.